सागरेश्वर - बागायत बीच येथे २२ व २३ फेब्रुवारी ला "पतंग महोत्सव"

टीम मेंगलोर आणि Fly ३६० डहाणू टीम यांची होणार भव्य पतंगबाजी
Edited by:
Published on: February 21, 2025 11:08 AM
views 200  views

वेंगुर्ले : 'पर्यटनाचा ध्यास आणि वेंगुर्ल्याचा विकास' या मुख्य उद्देशासाठी स्थापन झालेल्या 'माझा वेंगुर्ला' या संस्थेतर्फे २२ व २३ फेब्रुवारी दरम्यान उभादांडा येथील श्रीक्षेत्र सागरेश्वर - बागायत बीच येथे उभादांडा ग्रामपंचायत आणि बागायत ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे.

पतंग महोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून कोरोना कालावधी वगळता गेली पाचही वर्ष टीम मेंगलोर, Fly ३६० या डहाणू येथील टीमच्या सहकार्याने उभादांडा - नवाबाग समुद्र किनारा प्रकाशझोतात आणला होता. यावर्षीही वा-याचे सहकार्य लाभल्यास नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन टीम मेंगलोर, Fly ३६० टीम डहाणू आणि त्यांचे अन्य सहकारी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भव्य पतंगबाजीचे दर्शन घडवणार आहेत. समुद्रकिनारी असलेल्या वाऱ्यावर नागरिक, लहान मुले यांनाही पतंग उडवण्याचा आनंद घेता येणार आहे.

या राष्ट्रीय टीमच्या पतंगबाजी बरोबरच दोन्ही दिवस बीचवरील फन गेम्स, फायर शो, वॉटर स्पोर्टस्, कराओके गायन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच यावर्षी रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हर्षद मेस्त्री प्रस्तुत 'हर्षनाद जल्लोष मनोरंजनाचा' हा गायन आणि नृत्याचा कार्यक्रम हे विशेष आकर्षण असणार आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पनेसह साजरा होणारा माझा वेंगुर्लाचा पतंग महोत्सव आता लोकांचा उत्सव बनला आहे . विविध रंगाच्या लहान मोठ्या पतंगांनी भरलेले आकाश पाहण्यासाठी आणि पतंगबाजीचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे श्रीक्षेत्र सागरेश्वर -बागायत बीच येथे संपन्न होणाऱ्या या पतंग महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन माझा वेंगुर्ला तर्फे करण्यात आले आहे.