
चिपळूण : श्री गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने वै. के. भि. बापट ब्रह्मशाळा, बुरुमतळी, चिपळूण येथे शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ह. भ. प. श्री. शरदबुवा तांबे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. शरदबुवा तांबे यांनी बँक ऑफ इंडिया मधील नोकरी सांभाळून कीर्तन क्षेत्राचा व्यासंग जोपासला आहे. त्यांनी कीर्तनाचे शिक्षण प्रसिद्ध कीर्तनकार व संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक कै. पुरुषोत्तम प्रभाकर सहस्त्रबुद्धे यांच्याकडे घेतले. विशेष म्हणजे, कै. सहस्त्रबुद्धे गुरुजी हे वै. के. भि. बापट यांचेच शिष्य होते, ही परंपरेची साखळी आजही भक्तिभावाने जपली जात आहे.
गेल्या ३० वर्षांपासून शरदबुवा गुरुपौर्णिमेनिमित्त निरपेक्ष भावनेने कीर्तन सेवा करीत आहेत. त्यांच्या या भक्तिप्रवण, अभ्यासपूर्ण व श्रवणीय कीर्तनसेवेचा लाभ घेण्यासाठी सर्व कीर्तनप्रेमी सज्जनांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ब्रह्मशाळा संस्थेच्या वतीने श्रीराम रेडीज व श्री. धनंजय चितळे यांनी केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अध्यात्म, भक्ती आणि परंपरेचा संगम अनुभवण्यासाठी ही एक सुंदर संधी आहे.