
कुडाळ : राज्यातील सत्ताधारी भाजपा- शिंदे गट - अजित पवार गट यांच्याकडून अंदाधुंद कारभार सुरु आहे. जनतेच्या हिताच्या विरोधात सर्रास निर्णय घेतले जात असून त्यामुळे सामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. राज्यातील युवा वर्गाची सरसकट गळचेपी करण्यात येत आहे. तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही निर्णय या सरकारने घेतलेला नाही. सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येत असून कंत्राट घेणाऱ्या कंपन्या सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे युवा वर्गात प्रचंड क्षोभ निर्माण झाला आहे. तरुणांना नक्षलवादाकडे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या या भरतीच्या विरोधात खंडेनवमीला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, आधी फक्त शिक्षण सेवकांची भरती करण्यात येत होती. आता विविध सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीनेच भरती करण्यात येत आहे. पोलीस दलातील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. बहुतांश कंत्राटे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कंपन्यांना देण्यात येत आहेत. तरुणांना सरकारी नोकरीची दारे बंद करण्याचाच हा प्रयत्न आहे. अशा निर्णयांमुळे राज्यातील युवा वर्गाचे भविष्यच धोक्यात येणार आहे. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या तरुणांना भविष्यात कुणीही आपली मुलगी देणार नाही. गावखेड्यात आधीच त्रस्त असलेल्या तरुणांचे भवितव्य अशा निर्णयांमुळे आणखीन अंधकारमय होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील अनेक तरुण नक्षलवादाकडे वळले आहेत. हीच पाळी उद्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या तरुणांवर येण्याची शक्यता आहे.
अशी कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. तसेच या तुघलकी निर्णयांचा लवकरच निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. असे ही युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी म्हटले आहे.