खैर वृक्षतोडीबाबत वनविभागाची वेंगुर्ल्यात धडक कारवाई

Edited by: दिपेश परब
Published on: July 04, 2023 11:00 AM
views 212  views

वेंगुर्ला :  १८ मे २०२३ रोजीच्या  सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील डेगवे येथील शासकीय जंगलातील खैर वृक्षतोडीतील फरारी मालाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत वेंगुर्ला तालुक्यातील जय गणेश काथ इंडस्ट्रीज, पेंडूर येथे सुमारे  ५५.३३ घ.मी. विनापासी अवैध खैरकिटा तसेच कातभट्टी अटी-शर्तीचा भंग केल्याने सूमारे ९.९६ टन कातवडी  जप्त केली. 


सविस्तर वृत्त असे की, वनविभाग सावंतवाडीचे पथकाला पेंडूर ता. वेंगुर्ला येथील जय गणेश कात इंडस्ट्रीज येथे पुन्हा शासकीय जंगलातील खैर किटा आणला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने  काल दि. ३ जुलै रोजी सकाळी सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्राच्या संयुक्त पथकाने कातभट्टी व परिसराची अचानक धाड टाकून तपासणी केली असता अवैध विनापासी खैर किटा ५५.३३ घ. मी. आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. तसेच कातभट्टी अटी शर्तीचा भंग केल्याने तयार कातवडी सुमारे ९.९६ टन जप्त करून  भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२ब) तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ५३, ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावेळी वनविभागाकडून आवाहन करण्यात आले कि 'लाकूड मालाची अवैध विनापासी वाहतूक करणे, कातभट्टी अटी शर्तींचे उल्लंघन करणे हा वनगुन्हा असून भारतीय वन  महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील नियमांचे उल्लंघन असुन तो दंडनीय अपराध आहे.'


सदर कारवाई  उपवनसंरक्षक सावंतवाडी एस.एन.रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर व वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी अमृत शिंदे, मठ वनपाल सावळा कांबळे, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक  वि. श. नरळे, सूर्यकांत सावंत, आप्पासो राठोड, वैशाली वाघमारे, वनमजूर श्री. इब्रामपूरकर, श्री. पाडावे, राहुल मयेकर यांनी यशस्वी केली.