खासदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या केसरकरांनी पराजयाचा आकडा निश्चित करावा : विनायक राऊत

Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 15:37 PM
views 481  views

सावंतवाडी : शिंदेंसोबत गेलेले केवळ १५ आमदार नाही तर बरेच जण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. सरकारमध्ये अजित पवार यांच्या आक्रमणानंतर शिंदे गटाच्या आमदारांची अवहेलना सूरु आहे. हे पाहाता भविष्यात एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर माफी मागायला आल्यास आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. परंतु गद्दारांना माफी नाही. माफी मागायला आलेच तर त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अस विधान खासदार विनायक राऊत यांनी केल. गळाभेट घेण्याची सवय शिवसेनेत नाही. असा टोला देखील त्यांनी शरद पवार-अजित पवार भेटीवर हाणला. त्या दिवशीची अजित पवार व शरद पवारांची भेट लपून राहीली नाही. असं करण्यापेक्षा उघड भेटाव म्हणजे लोकांत संभ्रम राहणार नाही. पण, महाविकास आघाडी व देशात इंडिया भक्कम आहे असंही ते म्हणाले.


सरकारमध्ये एकमेकांच्या उरावर बसायचं काम सुरु झालं आहे. त्याचाच हा एक प्रकार आहे. मंत्री असूनही पालकमंत्री नाही हे महाराष्ट्राच दुर्भाग्य आहे. त्यामुळे कोकालातरी टिळा लावायचा, कुंकवाला धनी मानायच असा टोला मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील ध्वजारोहणासंदर्भात बोलताना त्यांनी लगावला. तर २०२४ ला कुणी कितीही डोकं आपटल तरी महाविकास आघाडीचा खासदार रत्नागिरी व सिंधुदुर्गतून निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या केसरकरांनी आपल्या पराजयाचा आकडा निश्चित करून ठेवावा असं मत व्यक्त केले. तर ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यान नाथ पै, प्रा.मधू दंडवते, सुरेश प्रभू यांसारखे विद्वान संसदपटू दिले. त्या़ंच्यासारख काम करण्याचा प्रयत्न मी करत आहे. परंतु, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत आपल्या भाषणात वैचारिक दारिद्र्य दाखवून दिल. कोकणला लागलेलं हे दूषण आहे असा हल्लाबोल खा. राऊत यांनी केला. यावेळी ठाकरे गटाचे बाळा गावडे, मंदार शिरसाट, योगेश धुरी, विक्रांत सावंत, मायकल डिसोझा, सागर नाणोसकर, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.