केसरकरांच्या विजयास राणे - भाजपाची साथ मोलाची : उमेश येरम

Edited by:
Published on: November 24, 2024 18:49 PM
views 96  views

वेंगुर्ला : राज्यातील सुसंस्कृत नेत्यांमध्ये ज्यांचे आदराने नाव घेतले जाते ते आपल्या मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे विजयाचा चौकार हा जनकौलातून दिसून आला. त्यासाठी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना खासदार नारायण राणे यांनी दिलेली भक्कम साथ कारणीभुत ठरली. यात प्रकर्षाने वेंगुर्ले तालुक्यासह शहरात भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी अभ्यासपुर्ण नियोजनाने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा दिपक केसरकर यांच्या विजयास महत्वपुर्ण ठरली. यामुळे आताच्या सत्तेतील मंत्री मंडळात मंत्रीपद त्यांना मिळू शकेल असा विश्वास शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हयातील बॅ. नाथ पै, मधु दंडवते, एकनाथ ठाकूर अशा नेत्यांचा वारसा दिपक केसरकर, समर्थपणे पुढे चावलत आहेत. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते विरोधकांना भारी पडले. या भागातील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम मतदानातून दाखवून दिले आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आमची खात्री होती. आणि खात्री असली तरी बेफिकीर न  रहाता प्रत्येक बुथ ठिकाणीचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला बचत गट, लाडक्या बहिणी, सिंधुरत्न योजनेचे लाभार्थी यांनीही दिपक केसरकर यांनी केलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी आपापल्या भागात निष्ठेने काम केले. त्याचा परीपाक दिपकभाईंचे मताधिक्य वाढण्यात झाला असल्याचे उमेश येरम यांनी स्पष्ट केले.

वेंगुर्ले तालुक्यात शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शहरी व ग्रामीण भागात तळागाळात बांधलेली शिवसेना संघटना या संघटनेतील शिवसेना पक्षाचे बेसिक, युवा, महिला, शाखाप्रमुख व कार्यकर्ते यांनी केसरकर यांच्या विजयासाठी आपापल्या भागात सातत्याने आपले उमेदवार दीपक केसरकर यांनी केलेल्या विकास कामांची तसेच महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केलेल्या योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाची पोचपावती श्री केसरकर यांना मिळालेल्या मतदानातून दिसून येत आहे.

वेंगुर्ले शहरासह तालुक्यात पर्यटनासह अन्य विकास कामांना निधी मंजूर झाला होता. त्यामुळे या कामांची भुमीपुजने झाली होती. तसेच काही कामे शेवटच्या टप्प्यात मंजूर झालेली होती. या निवडणुकीत वेंगुर्लेच्या विकासाचे महामेरू दिपक केसरकर हे निवडून आल्यामुळेच हि सर्व विकास कामे लवकरच वेगाने पूर्ण होतील असे शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी स्पष्ट केले.