जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास केसरकरांचे नेतृत्व पुरेसे : नितेश राणे

Edited by: साहिल बागवे
Published on: August 11, 2024 13:36 PM
views 478  views

कणकवली : राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका. महायुती म्हणून या जिल्ह्यातील विषय बोलायचे झाल्यास दीपक भाई तुमच्या सारखे ज्येष्ठ नेतृत्व आम्हाला पुरेसे आहे. दुसऱ्या कोणाची गरज नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीत युवा संदेश प्रतिष्ठानच्या सत्कार सोहळ्यात आमदार नितेश राणे बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आणि त्याचे जिल्ह्यातील नेतृत्व म्हणून शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्याकडे आम्ही पाहतो. एवढे ते ज्येष्ठ नेतृत्व आहे. लोकसभा निवडणुकीत सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या कामाचा, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा जवळून अनुभव आम्हा कार्यकर्त्यांना आला. दीपक  केसरकर यांनी जी मेहनत घेतली त्याची प्रचिती त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून दिसली असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.