कन्येच्या हॉस्टेलवर राणे, रविंद्र फाटकांचे गूंड पाठवतात सांगून केसरकर रडत होते : बबन साळगावकर

आज एकत्र येण्यासाठी नेमकं काय घडलं..? | बबन साळगावकरांचा केसरकरांना संतप्त सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2024 07:41 AM
views 1090  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत. ते एका भूमिकेवर कधीही ठाम राहिले नाहीत. केसरकरांनी राजकारणाच व्यवसायिकरण केलं आहे. ते व्यवसाय म्हणून त्याकडे पहातात. त्यांच्या राजकारणात अपेक्षा आणि इच्छा कमी असत्या तर त्यांना आपला स्वाभिमान गहाण टाकण्याची गरज भासली नसती असा टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी लगावला. तर आजवर त्यांनी स्वार्थासाठी राजकारण्यांसह अनेकांचा वापर केला अस साळगावकर म्हणाले. 

ते म्हणाले, २०११ मध्ये वेंगुर्ल्यामध्ये जो राडा झाला, या राड्यात अनेकांच्या पोटा पाण्याच्या व्यवसायावर लाथ मारली गेली. अनेकांच्या गाड्यांची तोडफोड झाली तो राडा केसरकर विसरलेत का ? सिंधुदुर्गातला दहशतवाद संपला असे सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी नारायण राणे यांच्याशी ते जवळीक साधत असल्याचा आरोप बबन साळगावकर यांनी केला आहे. गांधी चौकात कन्या सोनालीच्या हॉस्टेलवर राणे रविंद्र फाटकांचे गूंड पाठवतात असं सांगून केसरकर आणि समोर बसलेलेही रडत होते. आज एकत्र येण्यासाठी नेमकं काय घडलं ? या प्रश्नांची उत्तरे केसरकरांना द्यावी लागतील. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील प्रेम हे पूतना मावशीचे आहे. स्वतःचा संधी साधूपणा ते या प्रेमातून सिद्ध करत आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी वेळीच सावध व्हावे, त्यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही पण 'टेक केअर'अस मत सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. 

तर किरण सामंत यांना सुरुवातीला उमेदवार म्हणून घेऊन फिरणारे दीपक केसरकर आपल्या पक्षाचा उमेदवारासोबत न राहता भाजपसोबत राहिले. किरण सामंत यांच्या सक्षमेबद्दल बोलत केसरकर त्यांचा अपमान करत आहेत. केसरकरांची पावलं कुठच्या दिशेने आहे हे यावरून सिद्ध होते आहे. तर नारायण राणेंचा दरारा होता. त्यांच्या सोबत मी देखील काम केलं आहे. पण, आता असं काय झालं की राणेंना दीपक केसरकर यांच्या घरी जावं लागलं हा प्रश्न पडतो असं बबन साळगावकर म्हणाले. याप्रसंगी संदीप सावंत उपस्थित होते.