
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवाला आळा बसावा यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या मागणीस आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे लवकरच बैठक घेण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात, ३ एप्रिल २०२५ रोजी वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार दीपक केसरकर व इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्नाटक राज्याने राबविलेल्या रानटी हत्ती पकड मोहिमेच्या धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातही अशीच मोहीम राबवावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यानुसार, मुख्य वनसंरक्षक (नागपूर) यांच्याकडे रानटी हत्ती पकड मोहिमेचा सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी, अशी विनंती आमदार केसरकर यांनी केली आहे. तसेच, या बैठकीस स्थानिक आमदार म्हणून त्यांना आमंत्रित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना या हत्ती उपद्रवापासून कायमचा दिलासा मिळावा, यासाठी ही मोहीम अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.