
कणकवली ः कनेडी माध्यमिक विद्यामंदिरच्या शालेय समितीचे सदस्य बावतीस घोन्सालवीस यांनी आपल्या दिवंगत आई कै. मार्शेलिन लेक्स घोन्सालवीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करत प्रशालेतील 160 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्सचे वाटप केले. त्याचबरोबर कनेडी परिसरात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्या अनेक दिवंगत कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांच्या स्मृतींना उजाळा यानिमित्ताने देण्यात आला. एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत मातृ आणि समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी मिलाग्रीस चर्च पॅरीस प्रिस्टचे फादर मिलेट डिसोजा, वेंगुर्ला चर्चचे फादर फ्रान्सिस डिसोजा, मालवण चर्चचे फादर ऑलविन घोन्सालवीस, भिरवंडे चर्चचे फादर आनंद मास्कारेनेज, फादर रॉजर डिसोजा, मदर तेरेसा स्कूल वेंगुर्लाचे मुख्याध्यापक फादर फॅलिक्स लोबो , कॅथॉलिक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडीच्या चेअरमन आनमारी जॉन डिसोजा, मालवणचे नगरसेवक जॉन घाब्रीयल नोरोन्हा, मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते बावतीस घोन्सालवीस यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबईचे माजी अध्यक्ष, माजी आमदार कै. सि. स. सावंत, मुंबईचे माजी नगरसेवक व संस्थेचे माजी अध्यक्ष कै. मोहनराव मुरारीराव सावंत, माजी सभापती कै. शांताराम (भाऊ) रामचंद्र सावंत, क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई माजी सरचिटणीस कै. सुरेश शांताराम सावंत, माजी चेअरमन कै. एल. डी. सावंत, माजी चेअरमन कै. दौलतराव हरिश्चंद्र सावंत, उद्योजक व माजी विद्यार्थी कै. चंद्रकांत सदडेकर, माजी जि. प.सदस्य कै. रमाकांत वाळके, माजी संचालक कै. कैतान मिंगेल बस्ताडकर, बावतीस घोन्सालवीस यांच्या मातोश्री कै. मार्शेलिन लेक्स घोन्सालवीस, निवृत्त शिक्षक कै. डी. व्ही. सावंत आदी व्यक्तींमत्वांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, चंदनाचे रोप व सन्मानचिन्ह देऊन संस्था अध्यक्ष सतीश सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
फादर मिलेट डिसोजा म्हणाले, अर्धवट ज्ञान अतिशय घातक असते. शिक्षणाने मनुष्य ज्ञानी होतो. शिक्षणाशिवाय मनुष्य कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. आपले आयुष्य हे तीन पानांचे असते. त्यातील पहिले व शेवटचे पान देवाने लिहून पाठविलेले असते. पणं महत्त्वाचे मधले पान मात्र स्वतःचं लिहायचे असते. त्यासाठी स्वकर्तृत्व करून दाखवा असा संदेश देताना आपण या प्रशालेचा माजी विद्यार्थी असून येथे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. त्यानंतर फादर फ्रान्सिस डिसोजा, फादर ऑलविन घोन्सालवीस, श्रीम. आनमारी जॉन डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष सतीश सावंत यांनी बावतीस घोन्सालवीस यांना एवढा सुंदर कार्यक्रम घडवून आणल्या बद्दल धन्यवाद दिले. जीवनात निष्ठेने व सचोटीने वागून खूप अभ्यास करा व आपले तसेच आपल्या शाळेचे नाव खूप उज्ज्वल करा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संस्था सरचिटणीस शिवाजी सावंत, संचालक संजय सावंत, व्ही. बी. सावंत, शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य तुषार सावंत, प्रभाकर चांदोस्कर, माजी मुख्याध्यापक आनंद सावंत, श्री.बारदेसकर, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ, दिवंगत समाजसेवींचे कुटुंबिय, शिक्षणप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.