कासु ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण काम जानेवारी महिन्यात नव्याने सुरू करणार !

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबने केले आंदोलन स्थगित!
Edited by: शशिकांत मोरे
Published on: December 23, 2022 17:32 PM
views 255  views

रोहा : मागील ११ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगड प्रेस क्लबने आंदोलनाचा इशारा देताच नॅशनल हायवे विभागाने संयुक्त बैठक घेऊन त्यामध्ये कासु ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम जानेवारी महिन्यात नव्याने सुरू करणार असल्याचे आणि खड्डे भरणाऱ्या ठेकेदार एजन्सीवर कारवाई करण्याचे आश्वासित केल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबने वाकण येथिल नियोजित आंदोलन स्थगित केले. याबैठकीत महामार्गावर पडलेले खड्डे तातडीने भरण्यात यावेत, तसेच खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार तसेच देखरेख करणाऱ्या एजन्सीवर सक्त कारवाई करण्याची मागणी प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली.

मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु होऊन ११ वर्षे रखडले आहे, या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. पनवेल ते इंदापूर दरम्यान महामार्गावर भले मोठे खड्डे पडले आहेत. पेण ते कोलाड, तिसे हा रस्ताच उध्वस्त झालेला आहे. यारस्त्याचे खड्डे भरणारी एजन्सी सपशेल अपयशी ठरलेली असून कुठेही साधे खड्डे भरण्याचे दर्जात्मक काम एजन्सीला करता आलेले नाहीत, परिणामी या महामार्गावर पुन्हा मोठया प्रमाणावर अपघात होत आहेत. निष्पाप जिवांचे बळी जात आहेत, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात असंख्य प्रवासी गंभीररीत्या जखमी होत आहेत. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी अनेकदा आश्‍वासने दिली परंतु महामार्गाची दुर्दशा कायम असून हा रस्ता मानवी वापरासाठी अयोग्य असल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने बुधवार दि. ९ नोव्हेंबरला कोलाड ता. रोहा येथे मानवी साखळी आंदोलन केले होते. याप्रसंगी एनएचएआयचे अधिकारी यांनी उपस्थित राहून महिनाभरात रस्ता दुरुस्त करण्याचे सांगितले होते. 

     रस्त्यावरील साधे खड्डे भरून हा मार्ग सुस्थितीत करण्यास एनएचएआयला सपशेल अपयश आल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबने दि. २१ डिसेंबर रोजी वाकण नाका येथे अभिनव मार्गाने भजन आंदोलन करण्याचा इशारा मा. जिल्हाधिकारी रायगड आणि एनएचएआयला रितसर पत्र पाठवून दिला होता. याविषयी एनएचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी त्यांच्या पनवेल कार्यालयात गुरुवारी संयुक्त बैठक बोलावली, यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव अनिल भोळे, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. बैठकीत नॅशनल हायवे ने हा रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटीचा निधी मंजूर केला असून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याचे तसेच खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार व देखरेख एजंसिंवर कारवाई करण्यात येईल असे घोटकर यांनी सांगितल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबने नियोजित आंदोलन तात्पुरती स्थगित केले असल्याचे जाहीर केले आहे.


मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटीचा निधी मंजूर केला असून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार एजंसीवर कारवाई करण्यात येईल.


- यशवंत घोटकर

(राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक)


चौपदरीकरणाचे काम जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येणार असून तातडीने रस्तावर पडलेले खड्डे भरण्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबने नियोजित आंदोलन तात्पुरती स्थगित केले आहे.

- भारत रांजणकर - 

(अध्यक्ष, रायगड जिल्हा प्रेस क्लब.)