'कसई - दोडामार्ग'च्या विकास आराखड्याला नामंजुरी

विकासाचं गांभीर्य नसल्याने ते सभा सोडून गेले : नगराध्यक्ष
Edited by: लवू परब
Published on: September 09, 2025 17:37 PM
views 111  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या जनगणनेचा विचार करून प्रारूप विकास आराखडा रद्द करून नवीन विकास आराखडा करण्याची मागणी नगरपंचायतने केली आहे. यासाठी नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी विकास आराखड्याला नामंजुरी दिली असल्याचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर, चंदन गावकर उपस्थित होते. यावेळी चव्हाण बोलताना म्हणाले की दोडामार्ग शहराचा प्रारूप विकास आराखडा हा लोकसंख्या विचारात न घेता केला आहे. सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता कसई - दोडामार्ग नगरपंचायत वाढत चालली आहे. त्यामुळे केलेला विकास आराखडा रद्द करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवकांनी या आराखाड्याला नामंजुरी दिली आहे. तसा ठराव ही करण्यात आला आहे. त्यामुळे दोडामार्ग शहराची आताची नवीन जनगणना करून नवीन आराखडा करावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

विकास आराखडा प्रशासक असताना झाला

विकास आराखडा करताना त्यावेळी दोडामार्ग शहराच्या लोकसंख्येचा विचार झाला नव्हता का ? असा प्रश्न चव्हाण यांना विचारला असता चव्हाण म्हणाले की, लोकसंख्येचा विचार केला होता. मात्र प्रारूप विकास आराखडा करताना नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्हते त्यावेळी प्रशासक होते. ते असताना या विकास आराखाड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्याचा आता सर्व विचार केला तर शहरातील बऱ्याच नागरिकांचे या विकास आराखड्यात नुकसान होत आहे. म्हणून आम्ही नागरिकांच्या हरकती घेतल्या होत्या. नागरिकांचे नुकसान होता नये याचा सर्व विचार करून हा निर्णय घेतला आहे.


विरोध करणाऱ्यांनीच विकास आराखड्याचा ठराव घेतला होता 

विकास आराखडा करताना नगरसेवक संतोष नानचे यांनी विरोध केला होता असे नानचे विशेष सभेत बोलले होते. या संदर्भात प्रश्न विचारला असता, चव्हाण म्हणाले की नगरपंचायत प्रारूप विकास आरखड्याचा ठराव हा संतोष नानचे नगराध्यक्ष असताना घेण्यात आला होता. आता विरोधात विरोध आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मतांची बेरीज करून जनतेची फसवणूक करण्यासाठी नानचे हे कट कारस्थान करत आहे. विकास आराखाड्याचा ठरावच संतोष नानचे नगराध्यक्ष असताना घेतला होता. मग विरोध कसला केला गेला ? असे चव्हाण यांनी विचारले.


विकासाच गांभीर्य नसल्याने सभा सोडून गेले 

विकास आराखड्याच्या विशेष सभेवेळी नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, पांडुरंग बोर्डेकर, सोनल म्हावळणकर हे सभा त्याग करून गेले. यांसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यावेळी चव्हाण म्हणाले की, त्यांना दोडामार्ग विकास आराखड्याचे गांभीर्य नाही. आजची जी सभा होती ही शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने होती. त्यांना लोकांचे हीत साधायचे नसेल म्हणून ते सभा सोडून गेले. लोकांची दिशा भूल करण्यासाठी ते गेले असतील.