कसई - दोडामार्ग नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचं गुरुवारी भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांसह पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सेल्फी पॉइंट व सेमी फायर फायटरचेही होणार लोकार्पण पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: August 23, 2023 10:36 AM
views 87  views

दोडामार्ग :  कसई - दोडामार्ग नगरपंचायत सुसज्ज प्रशासकीय इमारतीच भूमिपूजन सोहळा तसेच सेल्फी पॉइंटचे व अग्निशमन फायर फायटर लोकार्पण सोहळा 24 ऑगस्टला रोजी संध्याकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विशेष उपस्थीतीत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. या सोहळ्यास शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केल आहे. 

 नगरपंचायतच्या हनुमंत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांचेसोबत उपनराध्यक्ष देविदास गवस उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, नगरपंचायत हद्दीतील लक्षवेधी सेल्फी पॉइंटचे काम पूर्ण झालेले आहे. हा सेल्फी पॉइंट दोडामार्ग ची ओळख दर्शविणारा ठरणार आहे. तर शहरात आवश्यक असलेला मिनी फायर फायटर (अग्निशमन बंब) उपलब्ध झाला आहे. या दोन्हींचे लोकार्पण  भूमिपूजन सोहळ्या वेळीच करणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली आहे. विकासाकडे झपाट्यानं वाटचाल करणाऱ्या या नवख्या नगरपंचायतसाठी शिंदे-फडणवीस सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे मंजूर झालेल्या ३ कोटींच्या प्रशासकीय ईमारत बांधकामाचा केंद्रीय मंत्री व दोन कॅबिनेट मंत्री यांच्या उपस्थितीत शुभारंभ होत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. येत्या वर्षभरात ही इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशस्त आणि सुसज्ज असेल नगरपंचायत प्रशासकीय इमारत….

  कसई दोडामार्ग नगरपंचायतची प्रशासकीय इमारत ही दोन मजल्यांची असून यामध्ये मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य सभापती यांच्यासाठी कॅबिन असणार आहे. तर बैठकांसाठी एक सभागृहही असणार आहे. या इमारतीत तळमजल्यावर गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळ मजल्यावर तातडीच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या सोयीसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे होणारी ही नगरपंचायतची इमारत सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असणार आहे, असेही नगराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.