करुळ घाटात सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 21, 2025 20:23 PM
views 103  views

सिंधुदुर्गनगरी : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिल्या जाते. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने सोमवार (दि २४) पासून वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक पुढील पंधरा दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा संदर्भात आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी उपस्थित होते.

गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (Safety Norms) प्राधान्य देत या घाटाचे काम पूर्ण झालेले आहे. दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. हे काम करताना प्रवासी सुरक्षितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. या घाटातून पहिल्या टप्प्यात वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत १० मार्च नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले.