करूळ घाटात १ फेब्रुवारीच्या आत एकेरी वाहतूक सुरु होणार

ठाकरे शिवसेने सोबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 20, 2025 20:28 PM
views 61  views

सिंधुदुर्गनगरी :  करूळ- गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शनिवारी  घाटरस्त्यावर जोरदार आंदोलन केले होते. घाटरस्ता बंद असल्याने नागरिकांचे नुकसान होत असून घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक करण्याची मागणी यावेळी शिवसेना नेत्यांनी केली होती.  त्याबाबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी फोनवर चर्चा  करण्यात आली असता त्यांनी  सोमवारी यासंदर्भात शिवसेना नेते , राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व  ठेकेदार यांची एकत्रित बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.

याबैठकीत  शिवसेना नेत्यांच्या मागणीचा विचार करून १ फेब्रुवारी २०२५ च्या अगोदर  करूळ- गगनबावडा घाट रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी  राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले आहेत. यावेळी एकेरी वाहतुकीकरिता वैभववाडी बाजारपेठ ते जामदारवाडी पर्यंतच्या रस्त्यावर डायव्हर्शन करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी  केली.  

           यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनीवार, ठेकेदार मिलिंद वेल्हाळ, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशील चिंदरकर, बाबू आसोलकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.