...तर कर्नाटक पसिंगच्या गाड्या माघारी परतणार नाहीत : प्रसाद गावडे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 17, 2023 15:24 PM
views 226  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौके, आंबेरी, असरोंडी, हेदुळ येथील चिरे खाणींवरून कर्नाटक मधील चंदगड, बेळगाव, तुडिये, नेसरी, शिनोली, कोवाड आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चिरे वाहतुक केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक चिरे वाहतूक करणारे व्यवसायिक व कर्नाटक येथील चिरे व्यावसायिक यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे.

चंदगड चिरे वाहतूक संघटनेने अलीकडेच बैठक घेऊन तिथल्या स्थानिक एजंटांमार्फतच चिरे पुरवठा करण्याचा तुघलकी निर्णय घेतला असून थेट चिरे पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांवर कारवाईस भाग पाडू असे फर्मान काढत जिल्ह्यातील चिरे वाहतूक व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांची मुस्कटदाबी करण्याचे धोरण आखले आहे. यासंदर्भात स्थानिक व्यवसायिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क करत आपल्या व्यथा मांडल्या असून आता मनसेने या वादात उडी घेत जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जर कर्नाटक भागांमध्ये एजंटांमार्फतच चिरेपुरवठा करण्याचे कानडी संघटनांचे धोरण असेल तर सिंधुदुर्गात देखील कर्नाटक चिरे व्यवसायिकांनी एजंटांमार्फतच खाणींवरून चिऱ्यांची उचल करावी असे धोरण आम्ही आखू, तसे न घडल्यास कर्नाटक पासींगच्या चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्या जिल्हयातुन माघारी जाणार नाहीत असा सूचक इशारा मनसेने दिला आहे."कुणीही यावे अन टपली मारून जावे" अशा प्रकारची मुजोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालवू देणार नसून यावर तात्काळ तोडगा न निघाल्यास चतुर्थीनंतर कानडी चिरे वाहतूक संघटनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा निर्वाणीचा समज मनसेच्या वतीने माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडेंनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे.