
सावंतवाडी : तालुक्यातील नियोजित मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलसह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरसह अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधांबाबत बुधवारी २० ऑगस्ट रोजी सावंतवाडीत आपल्या उपस्थितीत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांसह कारिवडे गाव कृती समिती यांची खास संयुक्त बैठक लावून कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा दिल्यामुळे शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडलेले आमरण उपोषण कारिवडेवासियांनी स्थगित केले.
कारिवडे गावातील २२ जणांच्या कृती समितीने गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी कृती समितीने मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कार्यान्वित होण्यास किती अवधी लागणार? असा सवाल करीत तोपर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरसह अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधां, ए एल एस ॲम्बुलन्स, पुरेसा औषध पुरवठा करण्याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आपण बुधवारी २० ऑगस्ट रोजी सावंतवाडीत येत असून खास बैठक घेऊन आरोग्य सुविधांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कारिवडे गाव कृती समितीचे भिकाजी कवठणकर, सिध्दीविनायक सावंत, आनंद तळवणेकर, शिवराम रेडकर, अशोक माळकर, महेश गावकर, प्रशांत राणे, सुशिल आमुणेकर, रवी परब, अरविंद परब, अमोल कारिवडेकर, संजय कारिवडेकर, अमर धोंड, उमेश गांवकर, प्रदिप केळुसकर, भालचंद्र भारमल, योगेश रेडकर, नितीन गावडे, तात्या सावंत, सिद्धेश केदार, लवू पार्सेकर, शंकर मेस्त्री उपस्थित होते.