गॅस टंचाईविरोधात कणकवलीत अनोखे आंदोलन..!

चुलीवर भाकरी करून वंचितचा सरकारला इशारा | पुरवठा सुरळीत करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 06, 2026 19:52 PM
views 34  views

कणकवली : देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चूल मांडून महिलांनी भाकरी व खिचडी तयार करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडर कधी मिळणार?या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी चुलीवर तयार केलेली भाकरी कांदा व मिठासोबत खाऊन गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक व हॉटेल व्यावसायिकांवर येणाऱ्या अडचणी अधोरेखित केल्या.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, विश्वनाथ कदम, नाना नेरूरकर, संदीप तळगावकर, गौतमी तळगावकर, संघमित्रा तळगावकर, आरती कांबळे, भागश्री तळगावकर, करुणा तळगावकर, सुहानी तळगावकर, संजय कांबळे, भिकाजी जाधव, नरेंद्र तळगावकर, केशव तळगावकर, रोहित तळगावकर, दिलीप तळगावकर, अतुल खरात, नेहा तळगावकर, सुनील तळगावकर, संदीप तांबे, अ‍ॅड. सुदीप उर्फ भाई कांबळे यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांची भेट घेऊन महिलावर्गाने व पुरुषांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. गॅस टंचाईबाबत झालेल्या चर्चेत लवकरच गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन श्री.कातकर यांनी दिले.

तानाजी कांबळे यांनी सांगितले की, देशभरात गॅस टंचाईमुळे महिलावर्ग व नागरिक मेटाकुटीस आला आहे. हॉटेल व्यवसायिकांना आपली आस्थापने बंद करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीस केंद्र व राज्य सरकार जबाबदार असून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.यासोबतच त्यांनी अकोला व अमरावती येथे गॅस सिलिंडर मिळवताना नागरिकांचा झालेला मृत्यूचे उदा. हि निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारचा निषेध व्यक्त केला व आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्याच्या सोबत न. पं. चे नगरसेवक लुकेश कांबळे व सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव उपस्थित होते. या आंदोलनाच्या माध्यमातून एक कणकवली शहरात चर्चेचा विषय बनत अनोख्या आंदोलनाने नागरिकांसह सरकारचे देखील लक्ष वेधले.