
कणकवली : कणकवली पं.स.मार्फत आयोजित केला जाणारा गावठी आठवडी बाजार पूर्ववत सुरु करा. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, बचत गटातील महिलांना उत्पन्न मिळत होते, अशी सुचना सदस्या सौ.दिव्या पेडणेकर यांनी मांडली. गावठी आठवडा बाजार हा निश्चितच चांगला उपक्रम होता. लवकरच याविषयी नियोजन करुन हा बाजार पं.स.च्या आवारात पूर्ववत सुरु करणार असे सभापती सौ. हर्षदा वाळके यांनी सांगितले. पं.स.ला 15 वा वित्त आयोगमधुन मागील 3 वर्षातील सुमारे 2 कोटी 22 लाखाचा निधी प्राप्त झाला असल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले. तर तालुक्यातील बालकांचे कुपोषण शुन्य टक्क्यांवर आणूया अशा सूचना सभापती सौ. हर्षदा वाळके यांनी केली.
कणकवली पं.स.ची पहिली मासिक सर्वसाधारण सभा प. पुज्य भालचंद्र महाराज सभागृहात सभापती सौ.हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शोक प्रस्ताव व अभिनंदनाच्या ठरावानंतर सभेचे कामकाज सुरु करण्यात आले. चार वर्षांनंतर पहिलीच सभा असल्याने सुरुवातीला सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. सर्व खात्यांच्या कामकाजाचा व राबविण्यात येत असलेल्या योजनांचा खातेप्रमुखांनी आढावा सादर केला. जि.प.बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतींना वेळेवर अंदाजपत्रके मिळत नसल्याचे सदस्य सौ.मानसी मराठे यांनी सांगितले. 64 गावांसाठी केवळ 2 शाखा अभियंता असल्याने विलंब होत आहे. लवकरच त्यात सुधारणा करु असे बिडीओ अरुण चव्हाण यांनी सांगितले. तर लघु पाटबंधारे विभागाचा आढावा घेताना तालुक्यातील नदी, नाल्यांवर असलेले बंधारे गाळांनी भरले असून तो गाळ उपसण्याची आवश्यकता आहे असे सदस्य राजेश जाधव यांनी सांगितले. फोंडाघाट पशुवैद्यकिय दवाखान्यात वैद्यकिय अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय असल्याची सदस्य पवन भालेकर यांनी सांगितले. कृषी सेवक हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नसल्याचे सदस्य गुरुप्रसाद वर्देकर यांनी सांगितले. तर पीएम किसानच्या अपडेटसाठी शेतकऱ्यांना तालुकास्तरावर येणे गैरसोयीचे होते असे पवन भालेकर यांनी सांगितले.
15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर ची माहिती देताना गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी या पूर्वी पं.स.कडे 2021-22 आर्थिक वर्षापर्यंतच निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर आता 2022-23, 2023-24, 2024-25 अशा तीन आर्थिक वर्षांसाठी एकत्रित 2 कोटी 22 लाख 76 हजार 874 रु.चा निधी प्राप्त झाला आहे असे सांगितले. हि कामे आराखड्यानुसार विचार विनिमय करुन लवकरच हाती घेतले जातील. त्याच बरोबर बंधित व 2025-26 या आर्थिक वर्षाचा निधी येणे बाकी आहे असे सांगितले.
आयत्या वेळेच्या विषयामध्ये लेखी प्रश्नाद्वारे सदस्य सौ.दिव्या पेडणेकर यांनी हरकुळ बुद्रुक, नागवे, करंजे गावांमध्ये असलेल्या बीएसएनएल च्या केबल अनेक ठिकाणी लोंबकळत असून त्या काढून टाकण्यासाठी संबंधित विभागाला कळवावे असे सांगितले. तर पं.स.च्या बंद असलेल्या गावठी आठवडा बाजाराकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना सौ.वाळके यांनी तत्कालीन सभापती सौ.भाग्यलक्ष्मी साटम व सौ. सुजाता हळदिवे यांच्या प्रयत्नातून सुरु झालेला हा बाजार आता बंद असून तो पूर्ववत सुरु केला जाईल असे सांगितले. महावितरणचा आढावा घेताना उपस्थित उपकार्यकारी अधिकारी संदीप पाटील यांना सदस्यांकडून अनेक प्रश्न व समस्या उपस्थित करण्यात आल्या. स्मार्ट मीटर बदलताना कल्पना दिली जात नाही. पावसाळ्यापूर्वी ट्री कटींग करा, थकीत बील चा मीटर पूर्वकल्पना दिल्यानंतरच बंद करा असे अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीकडे सदस्य राजेश जाधव यांनी लक्ष वेधले.










