कणकवली नगरपंचायतकडून विशेष ई कचरा संकलन मोहीम

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2026 11:17 AM
views 85  views

कणकवली : पेहेल-२०२६ हे सिंधुदुर्गमधील सर्वांत मोठे ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान, कणकवली नगरपंचायत व पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  कणकवली शहरात रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यामंदिर प्रशाला प्ले ग्राउंड (वेळ सकाळी 9-11) व रेल्वे स्टेशन परिसर (वेळ सकाळी 11-1 )या दोन ठिकाणी ई- कचरा संकलन केंद्राचे नियोजन करण्यात आलेले आहे . पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि ई-कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात निवासी सोसायट्या, व्यावसायिक ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये तसेच कॉर्पोरेट संस्था ई-कचरा संकलन केंद्रे म्हणून सहभागी होत आहेत. पेहेल अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ५० ठिकाणी ई-कचरा संकलन केंद्रे उभी करण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या जवळ असलेला इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल कचरा जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

या अभियानात संकलित होणाऱ्या ई-कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येईल. पुनर्वापरयोग्य लॅपटॉप, संगणक व टॅबलेट दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी वितरित केले जातील. उर्वरित ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) अधिकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांमध्ये पाठविण्यात येईल. नागरिकांनी ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी पुढाकार घेऊन पर्यावरणाचे रक्षण करावे आणि स्वच्छ, हरित व शाश्वत भविष्याच्या दिशेने एकत्र येऊन वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांकडून  करण्यात आले आहे.