धमकी दिल्याबाबत उबाठाचे नाटळ जि. प. उमेदवार उत्तम लोकेंकडून प्रतिज्ञापत्र

पोलीस अधीक्षकांसह गृहमंत्रालयाला देखील पाठवली प्रत
Edited by: स्वप्नील वरवडेकर | उमेश बुचडे
Published on: February 05, 2026 19:59 PM
views 119  views

कणकवली : नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उत्तम सुरेश लोके यांनी काल रात्री घडलेल्या घटनेनंतर आज आपल्या जीवितास धोका असल्याबाबत तसेच ठार मारण्याची धमकी दिल्या बाबत एक प्रतिज्ञापत्र केले आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र त्यांनी कणकवली पोलीस निरीक्षक यांच्यासह गृहमंत्रालय महाराष्ट्र, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केलेल्या विषयानुसार  4 फेब्रुवारी रोजी नाटळ जिल्हा परिषद मतदार संघामध्ये दारिस्ते या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर "तुला निवडणुकीच्या पूर्वी ठार मारणार", तू बूथ कसा लावतो तेच बघतो, अशी व या अनुषंगाने गंभीर स्वरूपाच्या धमकी देत असताना श्रीधर नाईक चौक येथे गाडी अडवून "याला आत्ताच्या आत्ता गाडीवर पेट्रोल ओतून जाळून टाकु" अशी धमकी दिल्याचे देखील या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

तसेच यासह अनेक गंभीर धमकी या संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या माणसांनी तसेच संजना सावंत यांनी दिल्याबद्दल हे प्रतिज्ञापत्र श्री लोके यांनी केले आहे. तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांच्या माणसांपासून किंवा त्यांच्यापासून माझ्या जीवितास व माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो अशी माझी खात्री झाली असून, माझ्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास त्यास संदेश सावंत, संजना सावंत व लोके यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद नावे केलेल्या सावंत यांच्या समर्थकांना जबाबदार धरण्यात यावे अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र श्री. लोके यांनी नोटरी कणकवली यांच्याजवळ केले आहे. तसेच ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ दिले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उत्तम लोके यांनी केलेले हे प्रतिज्ञापत्र साध्या कणकवली तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहे.