
दोडामार्ग : मी तुमच्यातलाच एक, तुमच्या सुख-दुःखाचा कायमचा सोबती अशा शब्दांतून माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबुराव धुरी यांनी मतदारांना भावनिक हाक दिलीय. आजवरचा प्रत्येक क्षण आपण लोकसेवेसाठी दिल्याचे अधोरेखित करत यावेळी काहीतरी देण्याची वेळ आपली आहे अशी हाक दिलीय. धुरी यांनी आपल्या प्रचारात मतदारांशी संवाद साधताना, आपल्या पर्यंत आता अनेक उमेदवार प्रचारासाठी पोहोचत असले, तरी खऱ्या अडचणीच्या वेळी घराघरांत, दुःखात आणि अश्रूंमध्ये कोण उभं राहिलं, असा सवाल उपस्थित करत, “जिथे कमी, तिथे बाबुराव धुरीची हमी” या एकाच सूत्रावर आयुष्यभर काम केल्याचे स्पष्ट केले. आजचे राजकारण पैशाच्या प्रदर्शनाकडे झुकत चालल्याची खंत व्यक्त करताना धुरी म्हणाले की, मी पैसे, वस्तू किंवा कोणतीही प्रलोभनं देऊ शकत नाही; मात्र प्रामाणिकपणा, निष्ठा, संघर्ष आणि विकासासाठीची तळमळ याची हमी आयुष्यभर देऊ शकतो.
दोन दिवस आधी आश्वासनांची खैरात वाटणाऱ्यांपेक्षा, दुःखात ढाल बनून कायम उभा राहणारा आणि सुखात खांद्याला खांदा लावणारा सच्चा सेवक आपणास हवा याचा विचार करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केलेली लोकशाही आज धोक्यात असल्याचे नमूद करत, पैशाच्या बळावर राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवण्याची हीच वेळ आली आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही विचारधारा आजही आमचा श्वास असल्याचे सांगत, तुमच्याच हक्काच्या, कामाच्या, प्रामाणिक माणसाला सेवेची एक संधी द्या,” असे आवाहन बाबुराव धुरी यांनी केल आहे.










