
बांदा : पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी यांच्या वतीने स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून सायकल रॅलीद्वारे व्यापक मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. ग्रामीण भागात मतदानाबाबत जनजागृती वाढविणे, लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे तसेच शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्या हस्ते सायकल रॅलीला सुरवात झाली. यावेळी स्वीप नोडल अधिकारी प्राची पाटील व स्वीप सहाय्यक नोडल अधिकारी तुकाराम मोरजकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी “माझा मत – माझा अधिकार”, “लोकशाही बळकट करूया, मतदान करूया”, “लक्षात ठेवा, लक्षात ठेवा – ७ फेब्रुवारी लक्षात ठेवा” अशा अर्थपूर्ण घोषणांचे फलक हातात घेतले होते.
शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या सायकल रॅलीने गावातील प्रमुख रस्ते, चौक तसेच वाड्या-वस्त्यांमधून फेरी काढत संपूर्ण परिसरात मतदानाबाबत जनजागृती केली. लोकशाहीविषयक घोषणा देण्यात आल्या, तर काही ठिकाणी नागरिकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यास प्रवृत्त करण्यात आले. यावेळी बोलताना स्वीप नोडल अधिकारी प्राची पाटील म्हणाल्या, “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजावला पाहिजे. मतदान म्हणजे केवळ हक्क नव्हे, तर लोकशाहीप्रती असलेले आपले कर्तव्य आहे.”
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पालकवर्ग तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, शिवराम गावडे, जयदेव गावडे, विलास गावडे, मधुकर गावडे, विठ्ठल गावडे, नामदेव गावडे, हरिश्चंद्र गावडे, रूपेश कविटकर, अजित असनोडकर, पोलीस पाटील समृद्धी गावडे, आशा सेविका उत्तरा नाईक, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, संचिता सावंत आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










