कणकवली सा. बां. विभागा विरोधात सुनील पारकर यांचा उपोषणाचा इशारा

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 22, 2026 10:38 AM
views 129  views

कणकवली : कणकवली  सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अंतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुका समन्वयक सुनिल दिगंबर पारकर यांनी दिली आहे.

मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अंतर्गत कणकवली गणपती साना ते जाणवली जोडणारा पूल तसेच कलमठ बिडयेवाडी ते कलमठ गावडेवाडी जोडणारा पूल ही कामे ई-निविदा पद्धतीने ठेकेदारास देण्यात आली होती. सदर कामांच्या अंदाजपत्रकात R.M.C. प्लांटचा वापर बंधनकारक असताना, संबंधित ठेकेदाराने दोन्ही पुलांची कामे AJAX मशीनद्वारे काँक्रिटीकरण करून पूर्ण केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय कलमठ बिडयेवाडी–कलमठ गावडेवाडी पुलाच्या ठिकाणी आवश्यक अप्रोच रोडच उपलब्ध नसल्याचे पाहणीत आढळून आले. पुलाच्या एका टोकाला सार्वजनिक विहीर तसेच स्थानिक नागरिकांची घरे असूनही, निव्वळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता  यांनी त्या ठिकाणी पूल उभारण्यास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पुलाचा सर्वसामान्य जनतेला कोणताही ठोस फायदा होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी करण्यात आली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे संबंधित शाखा अभियंता, उप-अभियंता तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे लेखी पत्र प्राप्त होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शिवसेना तालुका समन्वयक सुनिल दिगंबर पारकर यांनी दिला आहे.