
कणकवली : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. असे असताना काही गावातील नागरिकांचे मतदान हे नगरपंचायत भागात आहे व ग्रामीण भागात देखील आहे. अर्थात हे नागरिक दोन्ही ठिकाणी मतदान करतात. अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचा हक्क दिला पाहिजे. काही मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करत असतील तर त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे व दुबार मतदान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जायला हवेत, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली उबाठा शिवसेनेतर्फे कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील मतदारयादीत दुबार नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात आहे. एकाच घराच्या सातबारावर २५ ते ३० मतदार दाखविण्यात आले आहेत. या मतदारांचे भाडेकरार घेतले जाते का, याची प्रशासनाने पाहणी करावी. मतदार हे जिल्हा परिषद व नगरपंचायत अश्या दोन्ही ठिकाणी जर मतदान करत असतील व आम्ही मागणी करून देखील प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसेल प्रशासनाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.
कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील १७ वॉर्ड ची विभागणी आपण केली यात मोठ्या प्रमाणात फेरबदल आहेत. प्रशासनाची एक जबाबदारी होती, ठरवलेल्या सीमेनुसार म्हणजे रस्ते, व्हाळ या हद्दीनुसार वॉर्ड तयार केले असून त्या वॉर्डच्या हद्दीनुसारच मतदार यादी करणे अपेक्षित होते. आता मात्र १७ ही वॉर्ड मध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल आहेत. एका हद्दीतील मतदार हे दुसऱ्या वॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. हे सर्व बदल आपण ठरवलेल्या सीमेनुसार करण्याची पूर्णता जबाबदारी ही प्रशासनाची आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेवक उमेश वाळके, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, तेजस राणे, वैभव मालंडकर, योगेश मुंज आदी उपस्थित होते.










