
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट - हवेलीनगर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत अवैध गोवा बनावटीची १ लाख ८१ हजार ५०० रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पावलू बस्त्याव पिंटो (वय ३१ , रा. फोंडाघाट - हवेलीनगर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रामचंद्र शेळके ,हवालदार बस्त्याव डिसोझा, डॉमनीक डिसोझा,जॅक्सन घोन्सालविस हे पथक बुधवारी फोंडाघाट परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना फोंडाघाट - हवेलीनगर येथील पावलू बस्त्याव पिंटो हा अवैध गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संबधित ठिकाणी जाऊन पाहिले असता फोंडाघाट - हवेलीनगर येथे पावलू पिंटो याच्या राहत्या घराच्या पडवीत बॉक्स मध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या व बियरचे टिन आढळून आले. ते जप्त करण्यात आले. मुद्देमाल कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी बस्त्याव पिंटो याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










