कणकवलीतील ’कवी कट्ट्या’ वर आनंददायी काव्यप्रवाह

कोमसापच्या कार्यक्रमाला कवी - रसिकांची गर्दी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 12, 2025 19:14 PM
views 191  views

कणकवली : कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखेने कणकवली शहरात कवी कट्टा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक कवींनी सादर केलेल्या काव्यांचा प्रवाह खूपच आनंददायी होता.

कणकवली शाखेचे अध्यक्ष माधव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा संघटक आणि सुप्रसिद्ध मालवणी कवी रुजारियो पिंटो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कवी कट्टा कार्यक्रमात अगदी छोट्या कवीने देखील बालकविता सादर केल्या .कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच मधील हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कणकवली चे माजी सभापती सुरेश सावंत सचिव निलेश ठाकूर खजिनदार सिद्धेश खटावकर, राजन भोसलेआणि इतर मान्यवर उपस्थित होते

मालवणी कवी रूजारिओ पिंटो यांनी अनेक मालवणी कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. अनेक वेळा त्यांच्या कवितांमुळे कार्यक्रम स्थळी हास्याच्या लाटा उसळल्या. कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांनीसुद्धा कविता सादर केली. सामाजिक कार्यकर्ते बाळू मिस्त्री यांनी सलाम ही कविता सादर करून लोकांच्या समस्या कडे लक्ष वेधले. कवियत्री कल्पना मलये यांनी कविता सादर केली. पत्रकार गणेश जेठे यांनी मला कळत नाही या मथळ्याखालील कवितेचे सादरीकरण केले. बाळू मेस्त्री यांनी सलाम ही कविता सादर करत लोकांच्या समस्या कडे लक्ष वेधले.सत्यवान साटम यांनी जगणच असाह्य झालं असतं ही कविता सादर करून स्त्री च्या नात्याचे महत्त्व सांगितल. कवी रामचंद्र शिरोडकर यांनी मालवणी कविता गायली. निशिगंधा गावकर सावली तर मालिनी लाड नवोदित कवियत्रीने  अंतरीची वेदना ही कविता सादर केली. रीमा भोसले यांनी अवकाळी सर तर मालवणच्या कवियत्री ऋतुजा केळकर यांनी आठवणीतला पाऊस या कवितेचे सादरीकरण केले. अंगुलीमान पवार यांनी माझी माय मराठी , श्रेयस शिंदे यांनी रुटीन आणि काशिनाथ वर्देकर यांनी तुला व्हायचे आहे ही कविता सादर केली.

उमश्री दळवी या बाल कवियत्री ने पाऊस आणि सोहम यादव याने पाऊस ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कविता सादरीकरण सिद्धेश खटावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आणि कविता सादरीकरण निलेश ठाकूर यांनी केले. कवियत्री कल्पना मलये यांनी कार्यक्रम स्थळी सर्व तयारी केली सर्व सहभागी कवींना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले दोन तासाचा हा कार्यक्रम खूपच आनंददायी होता असे प्रतिक्रिया उपस्थित रसिकांनी दिल्या.