कणकवलीत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 11, 2025 19:38 PM
views 143  views

सिंधुदुर्गनगरी : कणकवली कॉलेज कणकवली येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कणकवली तालुका कृषि अधिकारी , स्नेह, सिंधु कृषि पदविधर संघ, सिंधुदुर्ग, उमेद सिंधुदुर्ग यांनी जिल्हास्तरीय रानभाजी विक्री, रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धांचा मेळ घालणारा रानभाजी महोत्सव बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित केला आहे.

काळाच्या ओघात पारंपरिक रानभाज्यां आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. नविन पिढीला तर या आयुर्वेदिक रानभाज्या आता अनोळखी होत चालल्या आहेत. म्हणूनच या दुर्मिळ ; आरोग्यदायी रानभाज्या पिकविणा-या सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतक-यांना रानभाज्या ओळख व्हावी व नविन बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आणि जिल्हयातील चोखंदळ जागरूक ग्राहकांना या रान भाज्यांची ओळख करुन देण्याच्या उद्देशाने रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे.

कणकवली तालुक्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यप्रेमी ग्राहकांनी शेतकरी , युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व सभासद यांनी या रानभाजी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन सिंधुदुर्ग प्रकल्प संचालक आत्मा व कणकवली तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.