
कणकवली : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर निळे भुंगेरे (Blue Beetle) या किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. ही कीड पिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. किडीची ओळख, प्रादुर्भावाची कारणे, लक्षणे आणि नियंत्रणाचे उपाय याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली जात असल्याची माहिती कणकवलीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ यांनी दिली आहे.
याबाबत ओहोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. या किडीच्या अळी अवस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. परिणामी पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात. या किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अवाजवी वापराने होऊ शकतो. ही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि कापणीनंतरच्या भाताच्या फुटव्यांवर उपजीविका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रव देते. त्यामुळे भात लावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत, असेही ओहोळ यांनी म्हटले आहे.
ऊन - पाऊस, पावसाची उघडीप व वातावरणातील जास्त आर्द्रता या किडीच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. भात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, म्हणजेच लावणीनंतर ही कीड मोठ्या प्रमाणात आढळते. प्रौढ भुंगेरे पानांवर लांबट पांढरट पट्टे तयार करतात, ज्यामुळे पाने वाळल्यासारखी दिसतात. किडीची अळी पानांच्या आत राहून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानांवर बारीक पांढऱ्या रेषा दिसतात. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते, अशी माहिती ओहोळ यांनी दिली आहे.
कृषी विभागाने या किडीच्या नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. जमिनीत पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी. भात खाचराच्या आजुबाजूस असलेल्या निळ्या भुंगेऱ्याच्या इतर खाद्य वनस्पती उदा. कसई, धुर, चिमण चारा, रानटी नाचणी इत्यादींचा समुळ नायनाट करावा. जेणेकरून या किडीच्या प्रौढ भुंग्यांना खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा पुढील प्रादुर्भाव रोखता येतो.
किडीच्या नियंत्रणासाठी व्किनॉलफॉस २५% प्रवाही २० मि. ली. किंवा ट्रायझोफॉस ४०% प्रवाही १२.५ मि.ली. किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन ५% प्रवाही ६.२५ मि.ली. प्रती १० लि. पाणी या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही ओहोळ यांनी केले आहे