
कणकवली : बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते असलेले पत्रकार राजन चव्हाण यांनी ३० वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांना सपत्नीक रोटरी क्लब कणकवलीच्या वतीने व्होकेशनल कम्युनिटी अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते मानपत्र शाल श्रीफळ देऊन पत्रकार चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे प्रेसिडेंट ऍड राजेंद्र रावराणे, सेक्रेटरी सुप्रिया नलावडे, ट्रेझरर ऍड गुरुनाथ पावसकर, रोटरीयन डॉ विद्याधर तायशेट्ये, डॉ. सुहास पावसकर, ऍड दीपक अंधारी, सचिन मदने, मेघा गांगण ,राजश्री रावराणे, राजन चव्हाण यांच्या पत्नी कवयित्री सरिता पवार उर्फ ऋजुता चव्हाण आदी उपस्थित होते.
राजन चव्हाण हे बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते आहेत. वयाच्या सव्वा अठराव्या वर्षापासून त्यांनी तब्बल 30 वेळा गरजू रुग्णांना तातडीने रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले आहे. बी निगेटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट आहे. गरजू रूग्णांना त्यांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्तपुरवठा होणे गरजेचे असते. बी निगेटिव्ह हा रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे तात्काळ रक्तदाता उपलब्ध होणे थोडे कठीण असते.
पत्रकार राजन चव्हाण यांनी आजवर अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर महिलांची प्रसूती, थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण, हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी असलेल्या रूग्णांना मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीने प्रवासाची पदरमोड करून सिव्हिल रुग्णालय ओरोस, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, नागवेकर हॉस्पिटल कणकवली येथे जाऊन रक्तदान केले आहे. पत्रकार राजन चव्हाण यांनी सामाजिक जाणिवेने आजवर 30 वेळा केलेल्या रक्तदानाची दखल घेत त्यांना रोटरी क्लब कणकवली सेन्ट्रल च्या वतीने व्होकेशनल कम्युनिटी अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल राजन चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.