
कणकवली : कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगरपंचायत प्रशासन, पोलीस व आरटीओ विभाग यांची संयुक्त कारवाई सुरू असतानाच काही नागरिकांनी त्याला विरोध केला. महामार्गानजीक आम्ही वर्षानुवर्षे वाहने लावत आहोत. उड्डाणपूल होईल त्यावेळी उड्डाणपुलाखाली तुम्हाला वाहने उभी करता येतील असे आम्हाला त्यावेळी तोंडी आश्वासन मिळालेले होते. मात्र, आज तुम्ही वाहनधारकांवरती विनाकारण कारवाई करत आहात. एक वेळ उड्डाणपुलाखालील खाजगी गाड्या काढा. मात्र, व्यावसायिक कारणासाठी उभ्या असलेल्या गाड्या तुम्ही काढायच्या नाहीत असा इशारा काही नागरिकांनी दिला.
यावेळी कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी नागरिकांशी चर्चा केली. मात्र, चर्चेवेळी कणकवली नगरपंचायतीचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. यावेळी भाजपचे सुरेश सावंत व अन्य उपस्थित होते.