
कणकवली : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी निलेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. कोमसापच्या कणकवली शाखेच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल सभागृहात झाली. यासभेत कणकवली शाखेच्या कार्यकारी मंडळाची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा संघटक, कवि रूजारिओ पिंटो आणि साहित्यिका सौ. वृंदा कांबळी हे दोन ज्येष्ठ साहित्यिक सदस्य निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
कणकवली शाखेचे पुढील तीन वर्षासाठी निवडण्यात आलेले कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे : अध्यक्ष माधव कदम, उपाध्यक्ष अशोक करंबळेकर आणि राजस रेगे, कोषाध्यक्षपदी सिद्धेश खटावकर, कार्यवाह निलेश ठाकूर, सहकार्यवाह अमर पवार या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून संदिप वालावलकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळ सदस्य रिमा भोसले, निकिता ठाकूर, चिराग बांदेकर आणि गणेश जेठे यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी सिद्धेश खटावकर यांनी स्वागत केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. त्यानंतर खटावकर यांनी मागील कामकाजाचा अहवाल सादर केला. अशोक करंबळेकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला. त्यास मंजूरी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी सर्व नविन पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आणि कणकवली शाखेने पुढील काळात विविध साहित्यिक उपक्रम राबवून शाखा आदर्श बनवावी असे आवाहन केले.
यावेळी बोलताना माधव कदम यांनी शाखाध्यक्षपदी आपली फेर निवड केल्याबद्दल उपस्थित सदस्यांचे आभार मानले. आणि कणकवली तालुक्यात विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांची पिंगुळी ग्रा.प. च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाखाध्यक्ष माधव कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यासभेस विद्यामंदिर हायस्कूलचे प्राचार्य पी.जे.कांबळे, ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण, साहित्यिक राजन भोसले तसेच कोमसापचे अन्य साहित्यिक सदस्य उपस्थित होते.