कणकवली शहरातील महामार्गाचे खड्डे बुजवा

अन्यथा स्वखर्चाने बुजवणार | समीर नलावडे यांचा महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना इशारा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 27, 2025 14:56 PM
views 216  views

कणकवली :  कणकवली शहरात महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यांना भलेमोठे खड्डे पडले असून हे खड्डे‌ रविवारी रात्रीपर्यंत बुजवा. अन्यथा महामार्ग प्राधिकरण जनतेची कामे करू शकत नसल्याने मी स्वखर्चातून हे  खड्डे उद्या सोमवारी सकाळी बुजवणार असल्याचा इशारा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री. साळुंखे यांना दिला आहे. 

कणकवली शहरात गेले अनेक दिवस महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यांना भलेमोठे खड्डे पडले असून हे खड्डे बुजवण्याकडे  महामार्ग प्राधिकरणचा दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी काही खड्ड्यांना तात्पुरत्या स्वरूपात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. परंतु हे खड्डे पुन्हा जैसे ती स्थितीत झाले आहेत. 

येत्या काळात गणेश चतुर्थी सण आहे. गणेश चतुर्थी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असतात. कणकवली हे बाजारहाटाचे प्रमुख केंद्र असून आसपासच्या गावांना कणकवली हीच मुख्य बाजारपेठ आहे. असे असताना महामार्ग प्राधिकरणाने हे खड्डे स्वतःहून बुजवण्याची गरज होती. परंतु महामार्ग प्राधिकरण अद्याप या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही नलावडे यांनी केला.