
कणकवली : शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याने राणे पिता-पुत्रांना पोटशूळ उठले आहे. त्यामुळे राणे पित्रा-पुत्र ठाकरे यांच्याविरोधात टीकाटिप्पणी, आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यामुळे राणेंना विजय सुकर झाला. याचा विसर पालकमंत्री नितेश राणे यांना पडला आहे. ठाकरेंवर टीकाटिप्पणी व आरोप करणाऱ्या राणे पिता-पुत्रांना आगामी निवडणुकांमध्ये जनता मतदानातून राणेंच्या टीका व आरोपांना उत्तर देईल. ठाकरेंवर टीका, आरोप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळात एक दिवसाचा सिंधुदुर्ग दौरा केला, असा प्रहार शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते.
उपरकर पुढे म्हणाले, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासासाठी आहे का? परप्रांतियांना पाठीशी घालण्यासाठी. सासोली, दाभोळ, पिंगुळी येथील स्थानिकांच्या जमिनी परप्रांतियांना देण्यासाठी लोकप्रतिनिधी व मंत्री यांचा राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. जमिनीचे खरेदी व विक्रीचे व्यवहार प्रकरणी नाव न घेता पेशाने डॉक्टर असणाऱ्या एका व्यक्तीला ही उपरकर यांनी लक्ष केलं. दाभोळ येथील जमिनी-विक्री खरेदीच्या व्यवहाराबाबत शिवसेना उबाठा पक्षाने आवाज उठविल्यानंतर परप्रांतीयांच्या गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा हायटेक करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतलेल्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील आरोग्यच्या सध्यस्थितीवरून निलेश राणेंनी त्यांना उघडे पाडले. मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष आहे. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्याचे धाडस पालकमंत्र्यांनी दाखवले नाही, अशीही टीका उपरकर यांनी केलीय.