
कणकवली | स्वप्नील वरवडेकर : कणकवली नगरपंचायतीची निवडणूक अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचली आहे. सुरुवातीला साधी - सरळ वाटणारी ही निवडणूक आमदार निलेश राणे यांच्या 'एन्ट्री'नंतर 'हाय व्होल्टेज' बनून गेली. अर्थातच भाजप आणि कणकवली शहर विकास आघाडी अशी दोन्ही पॅनेल सद्यस्थितीत तरी एकमेकांना कडवी टक्कर देत पुढे सरसावताहेत. प्रत्येक दिवशी विजयाची गणिते बदलताहेत आणि ही निवडणूक अख्या राज्यात लक्षवेधी ठरली आहे. साहजिकच कणकवलीकरांनाही प्रश्न पडलाय की, कणकवली कोणाची? समीर नलावडेंची की संदेश पारकरांची? नितेश राणेंची की निलेश राणेंची?
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष अगदी आधीपासूनच 'ॲक्शन मोड'वर होता. मात्र समोरील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे विरोधी पक्ष निवडणुकीला कसे सामोरे जाणार? हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार का? याची उत्सुकता तेव्हा कणकवलीकरांना होती. मात्र, शिंदे शिवसेनेसह वरील तिन्ही विरोधी पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली आणि या निवडणुकीत अनोखा 'ट्विस्ट' आला. अर्थातच आधी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक सद्यस्थितीत दोन्ही पॅनेलसाठी 'टफ' बनली आहे.
संदेश पारकर नगराध्यक्ष होतील ?
कणकवली शहर विकास आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी दस्तूरखुद्द संदेश पारकर निवडणूक रिंगणात आहेत. संदेश पारकर हे १९९२ ते २००२ अशी दहा वर्षे कणकवलीचे सरपंच होते. २००३ मध्ये कणकवली नगरपंचायतीची पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली, त्यामध्ये पारकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाले. या कार्यकाळात पारकर यांनी कणकवली शहरात केलेली विकासकामे आजही, खासकरून जुन्या कणकवलीकर मंडळींच्या स्मरणात आहेत. मोकळा आणि दिलखुलास स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. विशेष म्हणजे सलग पंधरा वर्षे कणकवली शहरावर हुकमत गाजवणाऱ्या संदेश पारकर यांना २००८ पासून ते आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधीपद भूषविण्याची संधी मिळालेली नाही. 'मी शेवटची निवडणूक लढवतोय' असे भावनिक आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे. या आवाहनाला कणकवलीकरांचा प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे.
पुन्हा एकदा समीर नलावडेच?
गतवेळची नगरपंचायतीची निवडणूक नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या वतीने तेव्हाच्या सत्ताधारी भाजप समोर लढवली होती. तरी देखील स्वाभिमान पक्षाने अथक मेहनत, नियोजनबद्ध प्रचार करून विजयश्री खेचून आणली होती. या विषयात सर्वाधिक मोठा वाटा होता समीर नलावडे यांचा. विशेष म्हणजे संदेश पारकर यांच्यावर समीर नलावडे यांनी ३६ मतांनी मात केली होती. नगराध्यक्ष या नात्याने नलावडे यांची कारकीर्द लक्षणीय राहिली आहे. कणकवली शहर हीच आपली कर्मभूमी असे मानून ते कार्यरत राहिले. त्यांच्या कार्यकाळात कणकवली शहरात दर्जेदार विकास कामेही घडली आहेत. अर्थातच भाजपने पुन्हा एकदा समीर नलावडे यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी उतरवले आहे. साहजिकच कणकवलीकर जनता पुन्हा एकदा नलावडे यांना नगराध्यक्ष बनवणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
शहर विकास आघाडी उत्साहात
आधी निरुत्साही वाटणारी कणकवली शहर विकास आघाडी आमदार निलेश राणे यांच्या 'एन्ट्री'नंतर प्रचंड उत्साही बनली. शहर विकास आघाडीतर्फे शिंदे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे शहर विकास आघाडीच्या वतीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे मालवण नगरपरिषदेची निवडणूकही होत असताना देखील आमदार निलेश राणे यांनी कणकवली शहरात अनेक प्रचार बैठका घेतल्या आहेत. संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदी बसविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. अर्थातच निलेश राणेंसह वरील सर्व मंडळी एकत्र असल्याने शहर विकास आघाडी प्रचारात अगदी उत्साही दिसत आहे.
भाजपचे 'मायक्रो प्लॅनिंग'
एकीकडे कणकवली शहर विकास आघाडी 'हायटेक' प्रचारावर भर देत असतानाच भाजप पक्ष मात्र 'मायक्रो प्लॅनिंग' राबवत पुढे चालला आहे. शहर विकास आघाडीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. भाजपकडून प्रत्येक मतदाराला गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणताही गाजावाजा न करता भाजप अगदी नियोजनबद्धरित्या या निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांचा अद्यापही म्हणावा तेवढा वावर दिसून आलेला नाही . मात्र नितेश राणे या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर गतवेळी समीर नलावडे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ सावंत हे देखील भाजपच्या प्रचार यंत्रणेत पूर्णतः सामील आहेत.
गुरु - शिष्यांची प्रतिष्ठा पणाला
कधीकाळी संदेश पारकर आणि समीर नलावडे हे दोघेही एकाच पक्षात कार्यरत होते. समीर नलावडे हे संदेश पारकर यांना आपले राजकीय गुरु म्हणायचे. मात्र याच गुरु - शिष्यांमध्ये २००७ च्या सुमारास काहीतरी बिनसले आणि ही जोडी स्वतंत्र झाली. विशेष म्हणजे तेव्हापासून ते आजतागायत शिष्याने गुरुला कायमच मात दिली आहे. २०१८ च्या निवडणुकीत तर शिष्याने गुरुला पराभूत कणकवलीच्या भूमीत पहिला पराभव स्वीकारायला लावला. अर्थात या पराभवाचे शल्य पारकर यांच्या मनात आहे आणि त्याचाच वचपा काढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मात्र कणकवलीत कमळ फुलविण्यासाठी समीर नलावडे यांनीही कंबर कसली आहे. अर्थातच संदेश पारकर आणि समीर नलावडे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निलेश राणे की नितेश राणे?
ही निवडणूक भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युती विरुद्ध सर्वपक्षीयांनी स्थापन केलेली कणकवली शहर विकास आघाडी अशी होत आहे. मात्र ही निवडणूक नितेश राणे विरुद्ध निलेश राणे अशी ही आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकीकडे नितेश राणे हे याच कणकवलीचे आमदारही आहेत. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत कणकवली शहरात फारसा लक्ष न देणारे निलेश राणे हे ऐन निवडणुकीच्या वेळी कणकवलीत दाखल झाले आहेत. नितेश राणे व त्यांच्या भाजपने कणकवली शहरातील आपली ताकद वेळोवेळी सिद्ध केली आहेच. पण, निलेश राणे यांना कणकवलीकरांचा मिळत असलेला प्रतिसादही लाजवाब आहे. साहजिकच या निवडणुकीत कणकवलीकर कोणत्या राणे बंधूला झुकते माप देतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
वैभव नाईक रणसंग्रामापासून अद्याप दूर
कणकवलीचे पहिले वाहिले उपनगराध्यक्ष असणारे माजी आमदार वैभव नाईक हे मात्र या निवडणुकीच्या रणसंग्रामापासून अद्याप दूर आहेत. वास्तविक कणकवली शहरात असे काही प्रभाग आहेत, जिथे नाईक कुटुंबाचा मोठा 'होल्ड' आहे. यापूर्वी झालेल्या चारही नगरपंचायत निवडणुकांमध्ये वैभव नाईक कायमच मोठी ताकद लावायचे. मात्र, निवडणूक शेवटची टप्प्यात आली तरीही वैभव नाईक कणकवलीच्या रणसंग्रामात सक्रिय झालेले नाहीत. नाही म्हणायला आपले बंधू सुशांत नाईक व संकेत नाईक यांच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे वैभव नाईक शेवटच्या टप्प्यामध्ये तरी शहर विकास आघाडीच्या प्रचारात दिसणार का? याचीही उत्सुकता कणकवलीकरांना आहे.
राजकीय राडेबाजी नसल्याने नागरिकही समाधानी
कणकवली शहरातील निवडणुका कायमच संवेदनशील, धगधगत्या संघर्षाच्या राहिल्यात. मात्र शेवटच्या दोन निवडणुका त्याला अपवाद आहेत. २०१८ च्या नगरपंचायत निवडणुकीत भलेही मोठी चुरस होती. मात्र निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. या निवडणूक कालावधीतही आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. अर्थातच याबाबत नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. निवडणूक अशीच शांततेच्या मार्गाने व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.










