
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे कणकवली शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सोमवारी सायंकाळी ७ वाजता कणकवलीत येत असून ते कॉर्नर सभा घेणार आहेत. यावेळी आमदार निलेश राणे हे देखील उपस्थित असणार आहेत श. हे दोन्ही नेते कॉर्नर सभेमध्ये काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.
ही कॉर्नर सभा कणकवली शहरातील संदेश पारकर यांच्या निवासस्थानानजीकच्या ढालकाठी येथे होणार आहे. कणकवली शहर विकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हेच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. या आघाडीमध्ये उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे पक्ष सहभागी आहेत. आमदार निलेश राणे यांनी तर शहर विकास आघाडीला निवडून आणण्याची जबाबदारीच स्वतःकडे घेतली आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेना यांची युती होऊ न शकल्याने शिंदे शिवसेनेचे नेते नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर कणकवलीत येत असलेले मंत्री उदय सामंत हे काय भूमिका घेणार ? सोबतच निलेश राणे आज शहरवासीयांना कसे आश्वासित करणार, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.










