
कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सदस्य पदाची आरक्षण प्रक्रिया सोमवारी कणकवली तहसील कार्यालयात पार पडली. कणकवली पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असल्यामुळे तालुक्यातील कोणते मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीअंती नांदगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे आता कणकवली पंचायत समितीच्या पुढील सभापती कोण असणार, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
कणकवली पंचायत समितीच्या सदस्य पदाची आरक्षण प्रक्रिया प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडली. चिठ्ठ्यांद्वारे ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. यात सर्वप्रथम अनुसूचित जातीची सर्वाधिक संख्या असलेला जानवली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला. तर गतवेळी कणकवली पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा राखीव असल्यामुळे आयोगाच्या नियमानुसार हा मतदारसंघ यावेळी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. त्यानंतर चिठ्यांद्वारे चार ओबीसी मतदारसंघ निश्चित करण्यात आले. त्यातील दोन मतदारसंघ ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. उर्वरित ११ मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असून त्यातील पाच मतदारसंघ खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आले. आरक्षण प्रक्रियेप्रसंगी कणकवली तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तहसील कार्यालयात उपस्थित होते.
जाहीर झालेले आरक्षण खालीलप्रमाणे :
असे आहे कणकवली पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण
तळेरे : सर्वसाधारण, खारेपाटण : सर्वसाधारण, नांदगाव : ओबीसी महिला, कासार्डे : ओबीसी सर्वसाधारण, जानवली : अनुसूचित जाती महिला, बिडवाडी : सर्वसाधारण महिला, लोरे : सर्वसाधारण महिला, फोंडा : सर्वसाधारण, हरकुळ खुर्द : सर्वसाधारण, हरकुळ बुद्रुक : सर्वसाधारण महिला
वरवडे : सर्वसाधारण, कलमठ : ओबीसी सर्वसाधारण, कळसुली : सर्वसाधारण, ओसरगांव : सर्वसाधारण महिला, नाटळ : ओबीसी महिला, नरडवे : सर्वसाधारण महिला.
कोण होणार सभापती?
कणकवली पंचायत समितीवर 1997 पासून नारायण राणे यांची सत्ता आहे. नारायण राणे ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या ताब्यात ही पंचायत समिती कायम राहिली आहे. विशेष म्हणजे गतवेळी तर नारायण राणे कार्यरत असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्व सोळाही जागा जिंकल्या होत्या. या वेळच्या निवडणुकीतही नारायण आणि कार्यरत असलेल्या भाजप पक्षालाच सर्वाधिक यश मिळेल, अशी शक्यता आहे. सभापतीपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे तर नांदगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. सद्यस्थितीत नांदगावच्या माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांचेच नाव सभापती पदावरसाठी आघाडीवर आहे. वाळके यांनी यापूर्वी सरपंचपदी भूषविले आहे मागील 'टर्म'मध्ये पंचायत समिती सदस्या म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही लक्षणीय आहे. त्यामुळे भाजप नेते नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे हे वाळके यांना पुन्हा संधी देतात का, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. तसेच नांदगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने व पंचायत समिती सभापतीपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी असल्याने या दोन मतदारसंघांमध्ये इच्छुकांची अधिक गर्दी होणार असल्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे.










