फोंडाघाट रस्त्याची चाळण

निकृष्ट कामावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 10, 2025 12:11 PM
views 154  views

कणकवली‌ : देवगड - निपाणी महामार्गावरील फोंडाघाट येथील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती न झाल्‍यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे देण्यात आला.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह जिल्हा चिटणीस ‌रुपेश जाधव,‌ कणकवली तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, विभाग अध्यक्ष उत्तम तेली, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, संतोष चव्हाण, तेजस पिळणकर, सुजल शेलार आदींनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी फोंडाघाट रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. तसेच दुरूस्तीची कार्यवाही न झाल्‍यास आंदोलनाचा इशारा दिला.

बागूल यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे, फोंडाघाट रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत‌आहे. मुख्य फोंडा घाट मार्गाची चाळण झाली असून, या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. देवगड – निपाणी राज्य महामार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू असून‌ त्याचे कंत्राट निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, या कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्याचे काम सुरू असताना घाट मार्गावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न ठेवता निष्काळजीपणे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

अलीकडेच ओरोस येथे एका शासकीय महिला अधिकाऱ्याचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाला या प्रकारातून कोणताही धडा मिळालेला दिसत नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असून, प्रशासन मात्र हातावर हात धरून बसले आहे, असे हे निवेदनात म्हटले आहे.