
कणकवली : तळेरे येथील प्रमोद शंकर तळेकर यांची मालवाहू रिक्षा जाळण्याचा अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केला. यात रिक्षेवरील प्लॅस्टिकची ताडपत्री व रिक्षाच्या समोरील शो जळून सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रिक्षा मालक प्रमोद तळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद तळेकर यांची मालवाहू रिक्षा असून ते तळेरे बस स्थानकात रिक्षा लावून व्यवसाय करतात. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रमोद तळेकर हे काम करून रिक्षा घेऊन घरी गेले. त्यांनी घराच्या अंगणात रिक्षा लावली. रात्री प्रमोद तळेकर व त्यांचे कुटुंबीय झोपलेले असताना त्यांची मुलगी अचानक उठली.
त्यावेळी तिला घराच्या अंगणात प्रखर प्रकाश दिसून आला. तिला बोलता येत नसल्याने तिने हातवारे करत आईला याबाबत माहिती दिली. त्यामुळे तिने पती प्रमोद यांना उठवून घटनेची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी अंगणात जाऊन पाहिले असता रिक्षेवरील प्लास्टिकची ताडपत्री जळत असलेली दिसून आली. घरातील पाण्याने ती आग विझवली. मात्र ताडपत्रीचा काही भाग व रिक्षेचा समोरील शो जळून गेले होते. यात प्रमोद तळेकर यांचे सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.










