
कणकवली : जग तिसऱ्या युद्धाच्या उबंरठ्यावर आहे. जगात तिसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यांचे परिणाम भारत देशाला भोगावे लागणार आहेत. युद्धामुळे देशाला भोगावे लागणाऱ्या परिणामांचा सामना करण्यासाठी देशवासीयांनी आतापासून तयार झाले पाहिजे. देशाच्या एकतेला आणि अखंडतेला भेदभावापासून धोका आहे. भारतविरोधी शक्ती भेदभवाच्या शस्त्राचा वापर करून देशातील एकता व अखंडतेता तोडून आपले मनसुबे यशस्वी करण्याचा डाव आखत आहेत. त्यामुळे देशवासीयांनी सतर्क राहून भारतविरोधी शक्तींचा बीमोड करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. देशवासीयांनी जगाला अध्यात्म शिकवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सौरभ बोडस यांनी केले. व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण करणे हा 'आरएसएस'चा उद्देश असून हा उद्देश गेली १०० वर्षे साध्य करण्यासाठी स्वयंसेवक प्रामाणिकपणे करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चौंडेश्वरी मंदिर सभागृहात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोडस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. अरविंद कुडतरकर, सहकार्यवाह विनय धावले, डॉ. महेंद्र आचरेकर, तालुका कार्यवाह किशोर दाभोलकर आदी उपस्थित होते.
बोडस म्हणाले, १९२५ मध्ये डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. गेल्या १०० वर्षात संघाने अनेक संकटे, संघर्ष, आव्हानांचा सामना केला. डॉ. हेडगेवार यांना संघाचे कार्य करताना उपेक्षा व उपहाराचा सामना करावा लागला, तरी त्यांनी संघाचे कार्य धीरोदत्तपणे सामना करत पुढे नेले. शक्तीची उपासना, उपसनेतील शक्ती हा राष्ट्र निर्माणाच्या कार्याचा मार्ग आहे. हिंदुत्व देशाला बांधून ठेवणारा धागा आहे. राष्ट्र ही हृदयात असलेली गोष्ट आहे. केवळ आपण एक देश नसून राष्ट्र तर अखंड हिंदुस्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत डॉ. हेगडेवर यांचा सहभाग होता. १०० वषार्पूर्वी लावलेल्या संघाच्या रोपाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अनेकदा बंदी घालण्यात आली. या उलट संघाचा विस्तार मोठ्या स्वरुपात झाला. संघ ही राजकीय संस्था नाही. पण संघाला राजकारण चांगले कळते. संघाच्या विचाराने प्रेरित होऊन काही चांगला संघटना काम करीत आहेत. देशावर जेव्हा जेव्हा संकटे ओढवली, त्या संघाच्या स्वयंसेवकांनी संकटकाळात मदतीचा हातभार लावला, असेही बोडस म्हणाले.
जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढले असून आंतरराष्ट्रीय निर्णयांमध्ये भारताचे मत विचारात घेतले जात आहे, ही बाब देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. २०१४ नंतर भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याने भारतविरोधी शक्तींनी कूटनीती चालू केली असून देशात भेदभाव निर्माण केला जात आहे. हा भेदभाव देशासाठी घातक आहे. त्यामुळे या भेदभावाला रोखणे देशवासीयांचे कर्तव्य आहे. लव्ह जिहाद हा देशात गंभीर विषय आहे. लव्ह जिहाद करण्यासाठी परकीय शक्तींकडून पैसा पुरवला जात आहे. देशवासायींनी लव्ह जिहादला विरोध केला पाहिजे. आहे. संघ ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, संघामध्ये नेहमीच चिंतनाची प्रक्रिया सुरू असते. यापुढील काळात संघामार्फत वृक्ष लागवड, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन शिबिरे घेतली जाणार आहे. संघामार्फत गावोगावी हिंदू संमेलने घेतली जाणार असून या संमेलनांमध्ये हिंदूंनी सहभागी होऊन राष्ट्रीय निर्माणाच्या कार्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन बोडस यांनी केले.
डॉ. महेंद्र आचरेकर म्हणाले, तरुणांमध्ये संघाची विचारसरणी रुजविण्याची गरज आहे. संघ म्हणजे काय हे लोकांना कळलेले नाही. नि:स्वार्थ प्रेम, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय सांस्कृतीच्या जडणघडणीत संघाचा सिंहाचा वाटा आहे. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, बबलू सावंत, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, मनोज रावराणे, नागेश मोरये, संघाचे संदीप राणे, जितेंद्र चिकोडी, नीलेश तळेकर, सुदेश राणे, संजय पाताडे यांच्यासह स्वयंसेवक, हिंदू बांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त गोसेवेची माहिती पोस्टर, व्यक्ती निर्माण केंद्र, पुस्तके यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.










