
कणकवली : देवगड – निपाणी महामार्गावरील फोंडा तिठा ते घाटपायथा आणि हुंबरठ तिठा ते करुळमार्गे फोंडा तिठा हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः जीवघेणा बनला आहे. आजवर या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून त्यात काहींना जीवही गमवावा लागला आहे. या रस्त्यावरील खड्डे पंधरा दिवसात बुजवा. अन्यथा व्हीव्हीआयपी लोकांसाठी बांधण्यात आलेल्या शासकीय विश्राम गृहासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा फोंडाघाट येथील काही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला.
यावेळी ग्रामस्थ तथा पत्रकार विशाल रेवडेकर यांच्यासह फोंडाघाटमधील समाजसेवक भाई हळदीवे, संदेश पटेल, पांढरीनाथ उर्फ भाई गुरव, दिलीप साटम, महेश रेवडेकर, विजय शिंदे, समीर मर्ये, सिद्धेश राणे, प्रतिभा अवसरे, माधवी दळवी, संजना कोलते आदी उपस्थित होते. दरम्यान पुढील कही दिवसात हुंबरठ ते फोंडा तिठा आणि फोंडा तिठा ते घाटपायाथापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने दिले.
सदर रस्त्याची दुरवस्था कायम असून फोंडाघाट हा परिसर अपघातप्रवण झोन बनला आहे. नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी रस्ता तातडीने खड्डेमुक्त करण्यात यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. अन्यथा काम पुर्ण न झाल्यास उपोषणाचा पर्याय करावा लागेल असा इशारा विशाल रेवडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला.










