'कुर्ला टू वेंगुर्ला' कोकणच्या तरुणांना व्यावसायिक प्रेरणा देणारा चित्रपट

चित्रपटाच्या संवाद कार्यक्रमात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
Edited by:
Published on: September 15, 2025 14:06 PM
views 81  views

कणकवली : 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा मराठी चित्रपट अस्सल कोकणच्या मातीतील चित्रपट आहे. गोवा चित्रपट महोत्सवात हा चित्रपट मी पाहिला आणि मला 'कांडर काजू' बाजारात आणण्याची प्रेरणा मिळाली. कोकणच्या तरुणांना व्यावसायिक प्रेरणा देणारा हा चित्रपट असून कोकणातल्या अनेक गुणी कलावंतांनी यात काम केले आहे. निर्माते चारुदत्त सोमण आणि त्यांचे सहकारी, दिग्दर्शक विजय कलमकर आणि लेखक अमरजीत आमले यांचे परिश्रम असलेला हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून तो सर्वांनी नक्की पहावा असे आवाहन सुप्रसिद्ध कवी, नाटककार आणि चित्रपट गीतकार अजय कांडर यांनी येथे केले.

'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट अभ्यासक यांच्याबरोबर कणकवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या चित्रपटाचे अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री वीणा जामकर, या चित्रपटातील कलाकार पत्रकार विजय गांवकर , संजय मालंडकर आणि चित्रपट अभ्यासक प्रसाद घाणेकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. सोमनाथ कदम आदींच्या उपस्थितीत हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

यावेळी बोलताना कवी कांडर यांनी कोकणातील तरुणांची लग्न जुळत नाहीत आणि कोकणातील मुलींना मुंबईचा नवरा हवा असतो. या मानसिकतेवर नेमकेपणाने भाष्य करणारा हा चित्रपट यावर उत्तरही शोधतो असेही आग्रहाने सांगितले. कुर्ला टू वेंगुर्ला विषयी बोलताना चित्रपट अभ्यासक प्रसाद घाणेकर म्हणाले, इतकी वर्षं वेंगुर्ल्याहून कुर्ल्याला गाड्या भरभरून इथली मुलं जात होती. या चित्रपटात कुर्ल्याहून वेंगुर्ला प्रवासाची आणि रोजगाराची दिशा सूचित केली आहे. आजच्या तरुण पिढीसमोरील गंभीर प्रश्न हसत खेळत सोडविण्याचे काही मार्ग कुर्ला ते वेंगुर्ला या चित्रपटाने दाखवले आहेत. स्पंदन या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना चित्रपट क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मिळवून देणाऱ्या गटाने निर्माण केलेला हा चित्रपट येथील जास्तीत जास्त तरुणाईने बघितला पाहिजे.

अभिनेते वैभव मांगले यांनी सांगितले की हा महाराष्ट्रातील सर्वच ग्रामीण भागातील भेडसावणारा प्रश्न आहे. आम्ही फक्त हे कोकणातून प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे सर्वांनीच हा चित्रपट अवश्य पहावा. तर अभिनेत्री वीणा जामकर यांनी, याची निर्मिती करताना जाणवले की हा एक चळवळीतला चित्रपट आहे. या चळवळीतली मुले ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत होते, ते खरोखरच वापरण्यासारखे आहे. यातूनच उद्याचे चित्रपटासाठी आवश्यक असणारे कलाकार, तंत्रज्ञ निर्माण होणार आहेत. वीणा जामकर यांनी आपल्या भूमिकेविषयी देखील माहिती यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. वैभव मांगले आणि वीणा जामकर यांच्यासह सर्वच उपस्थित मान्यवरांनी कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पहावा, असे आवाहन यावेळी केले.

या कार्यक्रमात प्राचार्य युवराज महालिंगे यांनी शुभेच्छा दिल्या.  प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा संदीप तेली यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.यावेळी प्रा .डॉ.राजेंद्र मुंबरकर ,प्रा.अमरेश सातोसे, डॉ. बी एल राठोड, डॉ. सुरेश पाटील, प्रा.गीता कुणकवळेकर, कुमारी सानिका राणे प्रा. प्रवीण कडूकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.