
कणकवली : कणकवली तालुक्यात शनिवार ६ सप्टेंबरला ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. शहरातील गणपतींचे विसर्जन करण्यासाठी न. पं.च्यावतीने गणपती साना येथे विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. विद्युत रोषणाईसह याठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी चौंडेश्वर मंदिर समोर नवीन डीपी रस्त्या कॉर्नरवर पुष्पवृष्टी करण्याची व्यवस्था न. पं. कडून केली आहे. ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळपासून गणपती सान्यावर भाविकांची गर्दी लोटणार आहे.
बुधवार २७ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणरायाची विधिवत स्थापना झाली. त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण होते. आरत्या, भजनांचे वाडया वस्त्यांवर निनाद घुमत होते. परंपरेनुसार दीड, पाच, सात, नऊ दिवसांचे गणपतींचे विसर्जन झाले. गेले १० दिवस गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली. गणेशोत्सानिमित्त घरोघरी महिलांच्या फुगडयांच्या कार्यक्रमांनी रंगत आणली. आज शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया..गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, असा जयघोष विसर्जनावेळी होणार आहे. तालुक्यातील वाडीवस्त्यांमधील गणेश घाटासह शहरातील गणपती सान्या अन्य गणेश घाटांवर गणपतींचे विसर्जन होणार आहे. नगरपंचायतीने गणपती साना येथे विसर्जनासाठी येणाऱ्या गणपतींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी न. पं.ने चौडेश्वरी मंदिर परिसरात व्यवस्था केली आहे. गणपती सान्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोशषाई केली आहे. गणपतीसान्या येथील जानवलीनदी गणपतींचे विसर्जन करण्यासाठी तराफ्याची व्यवस्था देखील केली आहे.