
कणकवली : कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली गेली अनेक वर्षे असलेल्या अतिक्रमणाबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या आदेशानंतरही संबंधित शासकीय विभागांकडून काहीच कारवाई होत नसल्याबाबत कोकणसाद लाईव्ह व दै. कोकणसादने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित शासकीय विभागाची मंडळी खडबडून जागी झाली खरी. मात्र, उड्डाणपूल गाठून या मंडळींनी कारवाई केली की मागील वेळेप्रमाणे केवळ नाटक, दिखाऊपणा केला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोकणसादच्या वृत्तानंतर पोलीस, नगरपंचायत, आरटीओ विभागाची मंडळी आज सोमवारी सकाळच्या सुमारास उड्डाणपुलाखाली अवतरली. मागील वेळेप्रमाणे या वेळेसही केवळ वाहनधारक, विविध विक्रेते यांना आपापली वाहने, दुकाने हटविण्याच्या सूचना व दंडात्मक कारवाईचा इशारा या अधिकारी मंडळींकडून दिला गेला. मात्र, दिवसभरात कारवाई काही होऊ शकली नाही. साहजिकच ही अधिकारी मंडळी केवळ सोपस्कार पूर्ण करण्यासाठी, केवळ कागद रंगविण्यासाठीच येथे आली होती का, असा प्रश्न आता कणकवलीकर नागरिक विचारू लागले आहेत.
व्यापारी महासंघ, कणकवलीकर नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना साधारण दिड महिन्यांपूर्वी दस्तुरखुद्द पालकमंत्री नीतेश राणे यांनी कणकवलीत अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, या आदेशाचे अधिकाऱ्यांकडून पालन न झाल्याबाबत कोकणसादने वृत्त प्रसिद्ध केले होते. अधिकारी मंडळी पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे का दुर्लक्ष करतेय, कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील जागा मोकळा श्वास कधी घेणार असे प्रश्न कोकणसादने उपस्थित केले होते. याच वृत्ताची दखल घेऊ न पोलीस, नगरपंचायत व आरटीओ विभागाचे अधिकारी, कर्मचारी आज सोमवारी सकाळच्या सुमारास उड्डाणापुलाखाली दाखल झाले. यामध्ये आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले व त्यांचे कर्मचारी, कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस तसेच नगरपंचायत विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम व नगरपंचायत कर्मचारी आदींचा समावेश होता.
अचानक कारवाईसत्र सुरु झाल्याने उड्डाणपुलाखालील विक्रेते, वाहनधारक यांचे धाबे दणाणले होते. आरटीओ विभागातर्फे वाहनधारकांना आपली वाहने हटविण्याच्या सूचना केल्या गेल्या. यात आरटीओ विभागातर्फे काही वाहनेही हटविण्यात आली. कारवाईप्रसंगी संरक्षण पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांतर्फे ध्वनीक्षेपकाद्वारे पुलाखालील आपापली आस्थापने हटविण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. याचवेळी नगरपंचायत विभाग केवळ बघ्याच्याच भूमिकेत असल्याचे दिसले. वास्तविक या कारवाईत सर्वाधिक जबाबदारी नगरपंचायतीची होती. मात्र, या विभागाकडून अपेक्षित कामगिरी दिसूच शकली नाही. सकाळी ११ वा. सुमारास कारवाईसत्र सुरु झाल्यानंतर दुपारच्या सुमारास वाहन चालक मालक संघटनेतर्फे सुरेश सावंत व काहींनी कारवाईस्थळ गाठून विरोध केला. आम्हाला पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसेल तर वाहने कुठे उभी करणार? उड्डाणपुलाची निर्मिती होत होती, त्यावेळी उड्डाणपुलाखाली वाहने उभी करता येतील, असे तोंडी आश्वासन आम्हाला मिळाले होते. मग आज आमच्यावर कारवाई का करता, असा सवाल सुरेश सावंत व इतरांनी केला. अखेर त्यांच्या आरोपाला कोणात्याही विभागाचे अधिकारी ठोस उत्तर देऊ शकले नाहीत व त्यानंतर कारवाई सुद्धा आपोआपच आटोपली.
कोकणसादच्या वृत्ताची दखल घेऊन शासकीय मंडळी भलेही उड्डाणपुलाखाली आली. मात्र, मागील वेळेप्रमाणे यावेळीही कारवाईचे नाटक करून या मंडळींनी काय साध्य केले? हा प्रश्न कणकवलीकर नागरिक विचारू लागले आहेत. उड्डाणपुलाखालील जागा मोकळा श्वास घेणार का? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीला आहे.