महाराजांच्या कोकणातील किल्ल्यांची वाईट परिस्थिती : सुधीर थोरात

किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 26, 2025 19:22 PM
views 25  views

कुडाळ : शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रम आणि शौर्याचा होता. त्यामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांचा इतिहास हा वैभवशाली व रोमांचक होता. महाराजांचा जाज्वल्य इतिहास हा प्रत्येक पिढीला प्रेरणादायकच आहे. लहानपणापासून या शिवचरित्राचे धडे प्रत्येकाला दिले गेले तर प्रत्येकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल. महाराजांच्या कोकणातील काही किल्ल्यांची आजही वाईट परिस्थिती आहे. त्या किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्याला दिलेला वारसा सांभाळून त्यांचा इतिहास जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे प्रमुख कार्यवाह सुधीर थोरात यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक  वारसास्थळात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. हा आनंदाचा क्षण एकत्रितपणे साजरा करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९५ रोजी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे)  तसेच शिव शंभू विचारमंच, शिवराज मंच, शिवप्रेमी संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्ग मावळा प्रतिष्ठान, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवप्रेमी तसेच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था मार्फत हा शिव अभिमान सोहळा आज येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रणजित हेरलेकर, इतिहास संशोधक व पुरातन शास्त्रज्ञ सचिन जोशी, मोडी लिपी अभ्यासक व लेखक विनायक महाबळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ (पुणे ) कार्यकारिणी सदस्य रुपेश मोरे, पंकज भोसले, अभिषेक रेगे, श्रीकृष्ण शिरोडकर, आनंद देसाई, विवेक पंडित, भाऊ बाक्रे, रमाकांत नाईक  वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी- कार्यकर्ते, शिवप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उदघाटन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शिव शभू विचार मंच (ठाणे - कल्याण) विभागाचे संयोजक व मोडी लिपी अभ्यासक पंकज भोसले यांच्यातर्फे हेमाद्री मोडी लिपीतील एकमेव हस्तालिखित त्रेमासिक मासिक प्रदर्शन मांडण्यात आले होते. यात शिवाजी महाराजांचे इतिहास काळातील मोडी लिपीतील ग्रंथ, पुस्तके, बोरु, दौत यांची मांडणी करण्यात आली होती. शिवप्रेमीनी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

थोरात यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा स्रोत' या विषयावर मार्गदर्शन केले. श्री थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वकर्तृत्वावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे त्यांचा इतिहास उलगडला गेला. शिवाजी महाराज नसते तर आपण आज सगळे मुस्लिम झालो असतो. त्यांनी आपल्यासाठी  हालअपेष्टा सहन केल्या. प्रत्येक संकटावर त्यांनी मात केली. त्यामुळेच त्यांनी इतिहास घडविला. औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी वयाच्या तेवीसव्या वर्षी लढत दिली होती. त्यांचेही देशासाठी खूप मोठे योगदान आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला लहान वयातच देव, देश धर्म यांच्या रक्षणासाठीचे धडे गिरविले.  त्यामुळेच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. हीच प्रेरणा घेऊन पुढे मराठा साम्राज्याचा विस्तार अखंड भारतभर झाला. शिवाजी महाराज आणि त्यांचे एक दुर्ग विज्ञान हे स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये परमोच्च स्थानी होते. मराठ्याची ओळख असणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जागतिक स्थळाच्या यादीत कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व खांदेरी या किल्ल्याचा समावेश झाला आहे. सिंधुदुर्गातील अनेक संस्था अथक परिश्रम करून हा पुरातन वारसा जतन करण्याचे कर्तव्य बजावत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला कळावा यासाठी आपण शिवचरीत्र वाचणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला.