LIVE UPDATES

'त्‍या' खूनप्रकरणी संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी

भर रात्री खून करून मृतदेह दरीत फेकला होता | त्‍यावेळी पोलीस ठाण्‍यात झाली होती अपघाती मृत्‍यूची नोंद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 12, 2026 20:26 PM
views 48  views

कणकवली : पाच वर्षांपूर्वी तरुणाचा खून करून त्‍याचा मृतदेह फोंडाघाटात दरीत फेकून अपघात असल्‍याचे भासवणार्‍या चार संशयितांना घाटकोपर क्राईम ब्रॅंचच्‍या ताब्‍यातून कणकवली पोलिसांच्‍या पथकाने शुक्रवारी सकाळच्‍या सुमारास कणकवली पोलीस ठाण्‍यात आणले. या चारही जणांना न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्‍यान या घटनेत आणखी दोन संशयितांचा सहभाग असून त्‍यांनाही लवकरच अटक करणार असल्‍याची माहिती कणकवलीचे पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली. तर हा अशपाक याचा मृतदेह फोंडाघाटात २८ डिसेंबर २०२१ रोजी आढळला असला तरी हा खून ५ डिसेंबर २०२१ या दिवशी कुडाळ येथील हॉटेल ओंकार डिलक्‍स येथे झाल्‍याचेही नलावडे यांनी सांगितले. अशपाक उर्फ निहाल राजशवल्‍ली मुलाणी (२५, सोलापूर) याच्‍या खूनप्रकरणी मनोज नारायण भंडगे (४३, नवी मुंबई), सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर (४०, खलापूर – रायगड), अतिष भगवान मोरे (३९, ठाणे), ऋतूराज रविंद्र शेट्‍टी (३१, ठाणे) असे चार जण सध्‍या अटकेत आहेत.

खूनाला फुटली वाचा

अशपाक याचा मृतदेह २८ डिसेंबर २०२१ या दिवशी फोंडाघाटात दरीत आढळला होता. मृतदेहानजीक दुचाकी देखील होती. याबाबत कणकवली पोलीस ठाण्‍यात अपघाती मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली होती. मात्र, दोनच दिवचसांपूर्वी या घटनेला वेगळे वळण प्राप्‍त झाले. दारूच्‍या नशेत एकजण बरळला असल्‍याची माहिती घाटकोपर क्रईम ब्रॅंचला प्राप्‍त झाली. त्‍यानुसार घटकोपर क्राईम ब्रॅंचच्‍या पथकाने संशयितांना ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता अशपाक याचा अपघात नव्‍हे तर सहा जणांनी मिळून खून केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले होते.

दांड्याने मारहाण अन् मृत्यू 

कणकवली पोलिसांनी केलेल्‍या चौकशीअंती प्राप्‍त झालेल्या माहितीनुसार सदरची खूनाची घटना ५ डिसेंबर २०२१ रोजी घडली आहे. वरील संशयितांसह आणखी दोघेजण व अशपाक असे सातजण घटनेच्‍या १५ दिवस आधीपासून सिंधुदुर्गात होते. संशयित एक कंपनी चालवत होते. त्‍यानुसार मालमत्ता मिळवून देण्‍यास मदत करणे, कर्ज  पुरविणे अशी कामे संशयित करायचे. याच कामाच्‍या अनुषंगाने ते सिंधुदुर्गात आले होते. कुडाळ येथील हॉटेल ओंकार डिलक्‍स येथे ते वास्‍तव्‍याला होते. दरम्‍यान अशपाक हा काही कारणानिमित्त तेथून निघून गेला. मात्र, तो ४ डिसेंबर २०२१ रोजी वैभववाडीत आला. आपण सोबत नेलेला कंपनीचा लॅपटॉप आणला आहे, असे त्‍याने संशयितांपैकी एकाला सांगितले. त्‍यानंतर रात्री १०.३० वाजता तो आपल्या दुचाकीने हॉटेल ओंकार डिलक्‍स येथे आला. त्‍यावेळी संशयित मद्‍यपान करत होते. याचवेळी आर्थिक देवाणघेवाणीच्‍या वादातून संशयितांनी अशपाक याला लाकडी दांड्याने मारहाण केली. यामध्‍ये अशपाक याला जबर मुका मार बसला होता. त्‍यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र, पहाटेच्‍या सुमारास एकाने पाहीले असता अशपाक हा बाथरूममध्‍ये मयत अवस्‍थेत दिसला.

मृतदेह 'इनोवा'ने फोंडाघाटात नेला

अशपाक मयत असूनही संशयितांनी दिवसभर मृतदेह हॉटेलमध्येच ठेवला होता. सर्वत्र सामसुम असल्‍याची खात्री होताच रात्री २.३० वा. सुमारास संशयितांनी अशपाक याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला. संशयितांच्‍या ताब्‍यात इनोवा कार होती. संशयितांनी अशपाकचा मृतदेह इनोवामध्‍ये घातला. अशपाक याच्‍या ताब्‍यातील दुचाकी एका संशयिताने चालवायला घेतली आणि सर्वजण फोंडाघाटात पोहोचले. तेथे संशयितांनी अशपाकचा मृतदेह व दुचाकी देखील दरीत फेकली. त्‍यानंतर संशयित तेथून पसार झाले.

आता तपासाची जबाबदारी कणकवली पोलिसांची

घाटकोपर क्राईम ब्रॅंच्‍या सतर्कतेमुळे एका खूनाला वाचा फुटली आहे. आता या घटनेचा सखोल तपास करण्‍याचे आव्‍हान कणकवली पोलिसांमोर आहे. पोलिसांनी आरोपींचा कसून तपास करावा व खूनाची नेमकी कारणे शोधून काढावीत, अशी अपेक्षा सिंधुदुर्गवासीयांकडून व्‍यक्‍त होत आहे.