
कणकवली : शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर वार्ड नजिकच्या श्रीधर नाईक उद्यान परिसरातील गड नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संकेत नाईक व जयेश धुमाळे उपस्थित होते.
नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हे अत्यंत दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सक्त सूचना सुशांत नाईक यांनी दिल्या. यावेळी नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील आणि लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागिय अभियंता विकास परब हे उपस्थित होते.
पाहणी दरम्यान उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी मराठा मंडळ आणि कनकनगर येथील केटी बंधाऱ्यातील गाळ काढण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत अधिकाऱ्यांनी सांगितले की, मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी यावर्षीच आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कनकनगर येथील केटी बंधाऱ्याचा गाळ पुढील वर्षी काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील केटी बंधाऱ्यांना लावलेल्या लोखंडी प्लेटिंमधून पाण्याची मोठी गळती होत आहे. त्यामुळे पाणीसाठा टिकून राहत नाही. ही गळती थांबवण्यासाठी जुन्या प्लेटि बदलून त्या ठिकाणी नवीन प्लटि बसवण्यात याव्यात, अशी सूचना श्री. नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली










