शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातून जावा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची मागणी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 20, 2026 12:54 PM
views 21  views

कणकवली : राज्य शासनातर्फे प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग राधानगरी शपर्यंत येत असून हा महामार्ग पुढे सिंधुदुर्गात यावा, अशी माझी मागणी आहे. हा महामार्ग फोंडाघाट मार्गे सिंधुदुर्गला जोडला गेल्यास सिंधुदुर्गला त्याचा विकासात्मक फायदा होणार आहे‌ याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले. 

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पारकर म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाची 'अलाइनमेंट 'राधानगरी परिसराच्या जवळून जात असल्याने, हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण राधानगरी ते सिंधुदुर्ग अंतर सुमारे 30 किमी आहे एवढेच आहे. हा महामार्ग मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडावा किंवा ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार सह्याद्री पायथ्याशी असलेल्या गावांमधून समांतर मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा. या निर्णयामुळे सह्याद्री पायथ्याच्या गावांचा विकास, आर्थिक दळणवळण व रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. महामार्गाची आखणी करताना कणकवली, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी या शहरांना थेट कनेक्टिव्हिटी देणे आवश्यक आहे.

प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण व घोटगे-पाटगाव महामार्ग यांना जोडणी केल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर प्रवास वेळ 3-3.5 तासांवरून 1-1.5 तासांवर येऊ शकतो. सध्याच्या अलाइनमेंटमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन व व्यापाराच्या दृष्टीने थेट फायदा होत नाही, तर त्याचा अधिक फायदा गोव्याला होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने, त्याचा प्राथमिक फायदा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हावा, ही आमची ठाम भूमिका असल्याचे पारकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून, या महामार्गामुळे गोव्याऐवजी सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना मिळणे अत्यावश्यक आहे.राधानगरीमार्गे मार्ग दिल्यास खालील सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सावंतवाडी (मोती तलाव, राजवाडा), दाजीपूर भयारण्य, आंबोली व सावडाव धबधबा, रांगणागड, देवगड-मालवण-वेंगुर्ला किनारपट्टी अशा पर्यटन स्थळांना फायदा होणार असल्याचे पारकर म्हणाले. 

"शक्तिपीठ" संकल्पनेनुसार कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल लक्ष्मीनारायण मंदिर, धामापूर येथील भगवती मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांना थेट फायदा होऊन धार्मिक पर्यटन वाढेल. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येतात; राधानगरी मार्गे कनेक्टिव्हिटी दिल्यास ही संख्या आणखी वाढेल, असेही पारकर म्हणाले.

जर महामार्ग थेट गोव्यात उतरवला, तर पर्यटक सिंधुदुर्ग टाळून थेट गोव्यात जातील, ज्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल. भविष्यात पर्यायी मार्ग विकसित झाल्यास मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कमी होऊन कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, ओरोस, कसाल या शहरांवर आर्थिक परिणाम होऊ शकतो. राधानगरीमार्गे मार्ग देऊन चिपी विमानतळ, देवगड व रेडी बंदरांशी जोडणी केल्यास संपूर्ण कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असेही पारकर म्हणाले.