
कणकवली : वत्सला प्रतिष्ठान लोकसाहित्यासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी येथे केले. गोपुरी, कणकवली येथे आयोजित द्रौपदी कुंभार स्मृती लोकसाहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मौखिक लोकसाहित्य हे शेतकरी व कष्टकऱ्यांच्या संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब असून, या परंपरेने समाजातील वेदना हलक्या करण्याचे तसेच गावगाड्याची एकी टिकवून ठेवण्याचे मोठे काम केले आहे. मात्र बदलत्या काळात हे लोकसाहित्य झपाट्याने लोप पावत चालले असून, त्यामुळे समाजातील एकोपाही कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकसाहित्याच्या माध्यमातून साजरे होणारे सण-उत्सव मागे पडत असून, नव्या पिढीला या परंपरांशी नाळ जोडली जात नाही. त्यामुळे या लोककला पुढील पिढीकडे सक्षमपणे हस्तांतरित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वत्सला प्रतिष्ठानसारख्या संस्थांनी संशोधन व संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून, या माध्यमातून सिंधुदुर्गातील लोकसाहित्य जतन होण्यास मोठी मदत होईल. केवळ पुरस्कार देणे पुरेसे नसून तळागाळातील लोककलावंतांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी लोकसाहित्य संशोधन पुरस्कार मोहन रणसिंग यांना प्रा. बांदेकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन प्रदान करण्यात आला. रणसिंग यांनी १९७७ पासून ठाकर लोककलेवर संशोधन सुरू ठेवले असून, त्यांच्या कार्याची दखल कमी प्रमाणात घेतली गेली होती. या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी मिळालेली रक्कम प्रतिष्ठानकडे देणगी म्हणून सुपूर्द केली. “संस्था चालविणे सोपे नसते,” असे सांगत त्यांनी आपल्या अनुभवांचीही मांडणी केली.
लोकसाहित्य संवर्धन पुरस्कार शिवदास मसगे यांना प्रदान करण्यात आला. लोककला जोपासताना सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक पातळीवर येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत त्यांनी या कलेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. पौर्णिमा केरकर, कवी वीरधवल परब, गोपुरी आश्रम अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, नामानंद मोडक व वत्सला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता कुंभार उपस्थित होत्या. डॉ. काजरेकर यांनी लोकसाहित्याचे दस्ताऐवजीकरण अत्यावश्यक असल्याचे सांगितले, तर प्रा. केरकर यांनी या क्षेत्रातील संशोधनाला मिळणाऱ्या प्रेरणेवर भर दिला. वीरधवल परब यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलता सुनील सावंत यांच्या लोकगीत गायनाने झाली. प्रास्ताविक मोहन कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले, तर सन्मानपत्रांचे वाचन प्रा. दर्शना पाताडे यांनी केले. विजय ठाकर यांनी ठाकर समाजाचा इतिहास व परंपरा याविषयी माहिती दिली.
यावेळी सिद्धार्थ गोपाळ तांबे, सरिता पवार, कल्पना मलये व सुचिता गायकवाड कदम यांचा साहित्य सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर—डॉ. बिरमोळे, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. अशोक कदम, सतीश पवार, डॉ. कोदे, प्रसाद घाणेकर, वामन पंडित, प्रा. हरिभाऊ भिसे, व्ही.के. सावंत, शलाका मेस्त्री, महेश काणेकर, संदीप सावंत, तनिष्का सावंत, विनायक सापळे, अरुण नाईक, मनीषा पाटील, प्रा. राजेंद्र केरकर, समृद्धी केरकर, विलास गुडेकर, किशोर कदम, निकेत पावसकर, राजन चव्हाण, मालती मेस्त्री आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वतः कार्यवाह मोहन कुंभार यांनी केली. ते म्हणाले वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसाहित्य संवर्धन व संशोधनाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले. द्रौपदी कुंभार यांच्या स्मृती जपण्याच्या भावनेतून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून, तळागाळातील लोककलावंत व संशोधकांना प्रोत्साहन देणे हेच प्रमुख ध्येय आहे. लोकसाहित्य केवळ परंपरा नसून समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा पाया आहे, त्यामुळे त्याचे जतन व पुढील पिढीकडे हस्तांतरण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात खेडोपाड्यातील लोककला शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता शिवदास मसगे यांच्या चित्रकथी सादरीकरणाने झाली.










