
कणकवली : रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ, रत्नागिरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रिगल हॉल, रिगल कॉलेज जवळ कोंढे तालुका चिपळूण येथे संपन्न झाली. सभेत रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या अध्यक्षपदी संजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संजय शिर्के हे कौशल्य विकास संस्था परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष या पदावर काम करीत आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील 'उत्कृष्ट नेतृत्व' पुरस्कार 'इकॉनोमिक अँड सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन,' नवी दिल्ली यांनी दिला आहे. कोकणभुमी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील "कोकण आयडॉल" पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने 'मराठा भूषण' पुरस्कार, असे अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे अडचणी, प्रश्नांना न्याय देण्यासाठी, संघटना मजबुतीसाठी यापुढे सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहील असे सूतोवाच माननीय शिर्के यांनी याप्रसंगी केले.
सभेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे मंगेश उर्फ बाबू तांबे, भगवान परशुराम शिक्षण मंडळाचे अभय सहस्त्रबुद्धे. कृषी भूषण डॉक्टर तानाजी चोरगे, शिक्षण संस्थेचे सचिव मिलिंद सुर्वे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे प्रशांत देवळेकर, महेश लकेश्री, रामराजे कॉलेजचे संस्थापक संदीप राजपुरे, प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संघटनेचे कोषाध्यक्ष सुधीर दाभोळकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अभिजीत हेगशेट्ये, रामपूर एज्युकेशन सोसायटीचे श्री. साळवी साहेब इत्यादी रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.










